आंबी

पुस्तकाचे नाव - आंबी
लेखक - विश्वास पाटील


विश्वास पाटील ह्यांची ही पहिली कादंबरी. एका सुंदर मुलीच्या आंबीच्या वाट्याला आलेल्या दुर्दैवी भोगाची कथा. आंबी थेट काळजाला हात घालते. तिची झालेली हेळसांड, भोगाव्या लागलेल्या दु:खाने डोळे ओलावतात. 

बाप्पाजीने आपल्या आई वेगळ्या लेकीला आंबीला कधी आईची उणीव जाणवू दिली नव्हती. त्यांचा भाऊ गणूआप्पा त्यांची बायको हिराकाकू आंबीला स्वतः ची लेक मानत होते. राधाकाकूची कुस उजवली नव्हती. वाढत्या वयात वाढणाऱ्या सौंदर्याची मोहीनी पडून अनेक तालेवार घराण्यांनी आंबीचा हात बाप्पाजीकडे मागीतला पण बाप्पाजींनी सगळ्यांना नकार दिला होता. त्यांनी आंबीच्या जन्माच्या वेळीच तिच्यासाठी मुलगा नक्की करुन ठेवला होता. त्यांच्या बहिणीचा मुलगा श्रीरंग. त्यांची बहीण या संबंधाला नकार देत होती. माझा लेक आंबीच्या लायकीचा नाही हे सांगत राहीली नंतर बाप्पाजीच्या आग्रहाला मान तुकवून लग्नासाठी तयार झाली. 

आणि सुरु झाले आंबीच्या दुर्दैवाचे दशावतार. 

तिचा पती षंढ होता. 

आंबी लगेच बापाच्या घरी निघून आली, वाटलं बाप्पाजी आपल्याला समजून घेतील. पण बाप्पाजींनी पोटच्या मुलीपेक्षा कुळाची इज्जत मोठी वाटत होती. लग्न करून मुलगी सासरी गेली म्हणजे कायमची दुरावली. तिला जर तिथे काही दु:ख सहन करावं लागलं तर ते तिचं नशिब. गणूआप्पाच्या विरोधाला न जुमानता ते आंबीला परत सासरी सोडून येतात. 
पण नवऱ्याने केलेल्या मारहाणीमुळे ती परत माहेरी निघून येते. बाप्पाजींनी कुळाची इज्जत मातीमोल झाल्यासारखं वाटतं. 

ह्या घरात एक तर आंबी राहील किंवा मी असा पवित्रा घेतल्यावर गणूआप्पा गावातील पंचांना बोलवून घराचा हिस्सा मागतो. का.. तर.. तो आंबीला मार खायला सासरी पाठवायच्या विरोधात असतो. त्याला आंबीचं परत दुसऱ्या चांगल्या ठिकाणी लग्न लावून द्यायचं असतं ज्याला बाप्पाजींचा विरोध असतो. आंबीचं दुसरं लग्न केलं तर कुळाची इज्जत जाईल असे त्यांना वाटत असते. 

या सगळ्या गदारोळात आंबीला जगणं नकोसं होतं. तिने आत्महत्या करायचा प्रयत्न केल्यावर गणूआप्पा आप्पा आणि राधाकाकू तिला मावशीकडे पाठवून देतात. 


वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी विश्वास पाटीलांनी लिहिलेली व महाराष्ट्र शासनाच्या नवलेखक अनुदान योजने अंतर्गत प्रकाशित झालेली ही कादंबरी वाचतांना ही लेखकाची पहीली कलाकृती आहे किंवा वयाच्या सतराव्या  वर्षी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना लिहिलेली आहे असे वाटतच नाही. 










Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.