लेखक - स्काॅट ओ डेल
अनुवाद - मैत्रेयी जोशी
दोनशे वर्षांपूर्वी घडलेल्या सत्यकथेवर आधारीत असलेलं हे पुस्तक.
आयलंड ऑफ द ब्ल्यू डाॅल्फिन्स या बेटावर ख्रिस्तपूर्व २००० च्या आसपास इंडियन्स आले. ते या बेटावरील पहिले रहिवासी होते.
१६०२ मध्ये स्पॅनिश संशोधक सेबास्टियान विसकायनो अशा बेटाच्या शोधात होता जिथे फिलिपाईन्सहून खजिना गोळा केलेली मोठ्या शिडाची व्यापारी जहाजे आश्रय घेऊ शकतील.
कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याचा उत्तरेला प्रवास करीत असतांना त्याला हे बेट दिसले. त्याने या बेटाचे "ला इला डा सॅन निकोलस" असे नामकरण केले. निळ्या डाॅल्फीनचे बेट अशी त्याची दुसरी ओळख. त्यावेळी हे बेट निर्मनुष्य वाटले.
सहा मैल लांब व तीन मैल रुंद असं हे लहानसं बेट.
त्यानंतर दोन शतकांनी एक अमेरिकन जहाज या बेटावर आले तेव्हा त्या सबंध बेटावर एकच स्री होती जी गेल्या आठरा वर्षांपासून एकटीच तिथे होती. तिचं नाव कराना !
त्या करानाची ही चित्तथरारक गोष्ट !
त्या बेटावर राहणाऱ्या आदिवासींची संख्या अत्यंत थोडी होती. पैकी पुरूष पंचेचाळीस आणि स्रीया चाळीसच्या आसपास बाकीची दहा पंधरा मुले होती.
बेट ऊंच सुळक्यांनी घेरलेलं असल्याने लांबून दिसायचं नाही. किनाऱ्यावर समुद्रात विविध प्रकारचे विपूल मासे होते. ऑटर माश्याची कातडी चमचम करायची. त्या माशांची शिकार करण्यासाठी एकदा रशियन जहाज आले. त्या लोकांना आदिवासी जमाती कडून विरोध झाल्यावर जी चकमक उडाली त्यात अनेक आदिवासी मारले गेले. करानाचे वडीलही मृत्युमुखी पडले.
ते जहाज निघून गेल्यावर बेटावर राहणे सुरक्षित नसल्यामुळे त्यांनी स्थलांतर करण्याचे ठरवले. त्यांचा नायक दुसरे बेट शोधण्यासाठी गेल्यावर काही दिवसांनी दुसरे एक जहाज आले. आदिवासी नायकाने त्यांना घडलेली हकिगत सांगितल्यानंतर ते आदिवासी लोकांच्या बचावासाठी आले आले होते. सगळे जण जहाजावर चढल्यावर करानाच्या लक्षात आले की तिचा सहा वर्षाचा धाकटा भाऊ बेटावरच राहून गेलाय. तिने विनंती करुनही जहाज परत फिरवले नाही. आता ते किनाऱ्यापासून समुद्रात निघाले होते.
भावाच्या काळजीने चिडलेल्या करानाने समुद्रात उडी मारुन किनारा गाठला तेव्हा तिचा भाऊ खूप घाबरलेल्या अवस्थेत होता.
जहाज दूर दूर जात राहिले. आता बेटावर कराना आणि तिचा भाऊ दोघेच राहिले.
मासेमारी सोबत किरकोळ शिकारी करीत ते दोघे आपल्याला घ्यायला जहाज येईल अशी अपेक्षा करीत होते.
काही दिवसांनी एका कुत्र्याच्या टोळीने करानाच्या भावाचा बळी घेतला. आणि कराना एकटी राहिली.
आणि सुरु झाला तिच्या जीवंत राहण्याचा संघर्ष.. तेव्हा तिचं वय फक्त बारा वर्षे होतं
तब्बल आठरा वर्षांनंतर एका अमेरिकन जहाजावरील लोकांना ती बेटावर दिसली. एका ओबडधोबड घरात एका कुत्र्याच्या सोबतीने ती राहत होती.
१८३५ ते १८५३ अशी आठरा वर्षे ती एकाकी राहिली होती.
इतिहासात ती सॅन निकोलसची हरवलेली स्री म्हणून प्रसिद्ध आहे.
सांता बार्बरा मिशनचे फादर गोन्सालीस ह्यांनी तिचे समुपदेशन केल्यावर करानाने आपली सगळी हकिगत सांगितली जी अत्यंत विस्मयकारक होती. एका बारा वर्षाच्या मुलीने एकट्याने जंगली पशुंचा आणि निसर्गापत्तीचा सामना केला होता.
त्या बेटावर आता यु एस नेव्हीचा तळ आहे. वैज्ञानिकांना आशंका आहे की, लाटांचा होणारा सततचा मारा आणि प्रक्षुब्ध वारे यामुळे हे बेट परत समुद्रात गडप होऊ शकतं