लेखक - रंगनाथ पठारे
अत्यंत नाजूक परंतु प्रक्षोभक विषयावर इतक्या संयतपणे कादंबरी लिहिणारे लेखक क्वचितच असतात. रंगनाथ पठारे सर त्या पैकी एक.
मोठ्या गावात किंवा छोट्या शहरातील सुस्थापित तीन कुटुंबे म्हणजे तीन जोडपी, डाॅक्टर, वकील आणि प्रोफेसर. वयाच्या चाळीशीच्या आसपासचे. आर्थिक दृष्ट्या स्थिरता आलेली, मुले बाळे किशोरवयात आलेले, त्यांची एकमेकांशी अत्यंत सुसंस्कृत मैत्री होती. कधी एखाद्याच्या घरी , कधी शहराबाहेर एखाद्या शांत ठिकाणी असलेल्या गेस्टहाऊसवर महिन्यातून एखाद दोन वेळी सगळे एकत्र यायचे. शक्यतो शनिवारी. मुले कधी सोबत असायची, कधी नसायची. माफत प्रमाणात ड्रिंक घेत गप्पा टप्पा, विषय कोणताही चालायचा नंतर सहभोजन.. मग पहाटे केव्हातरी झोपणं.. असं केल्याने मन ताजंतवानं होऊन पुढच्या काही दिवसांसाठी उर्जा मिळते अस वाटायचं.
एकदा स्रीच्या मातृत्व पणाचा विषय निघाला. मातृत्वासाठी स्त्री काहीही करू शकते असं डाॅक्टरांचं म्हणणं आलं. गायकाॅनालाॅजिस्ट असल्यामुळे त्यांनी स्वत्:चे अनुभव सांगीतले.
लग्न होऊन सहा वर्षे होऊनही मुलबाळ न झालेली एक स्री त्यांच्याकडे आली. डाॅक्टरांनी आयव्हीएफ चा पर्याय सुचवला आणि नवऱ्याला सोबत आणायला सांगीतलं. घराशेजारी राहणाऱ्या शिंप्याशी तिने संबंध ठेवले होते पण ती काही आई झाली नाही.हे तिच्या नवऱ्याला ही माहिती होतं. तेव्हा प्रोफेसरच्या पत्नीला प्रोफेसर फेलोशिप साठी वर्षभर घरी नव्हते तेव्हा त्यांच्या बंगल्यातील पेईंगगेस्ट तरुणासोबतचे आपले चोरटे संबंध ताजे झाल्यासारखे वाटले. खरं तर ही गोष्ट प्रोफेसरांना समजली होती. पण संसार मोडायला नको आणि मुलांच्या भविष्याशी खेळ नको म्हणून मनातच ठेवली होती.
दुसऱ्या एका जोडप्याने डाॅक्टरांनाच मार्ग दाखवायला सांगीतलं. त्यांना नैसर्गिकरित्या अपत्यप्राप्तीसाठी डाॅक्टरांचीच मदत घेतली. अर्थात हे सांगताना डाॅक्टरांनी आपल्या ऐवजी दुसऱ्या डाॅक्टराची गोष्ट म्हणून सांगीतलं.
नैतिक अनैतिक पासून परदेशातील मुक्त संबंध, स्वातंत्र्य की स्वैराचार, मानसिक उदात्तता, पुराणकालीन नियोगाचे दाखले देत चर्चा याच विषयावर पण इकडून तिकडे फिरत राहीली. आणि त्या रात्री भिड चेपत गेली आणि त्या रात्री त्यांनी आपले जोडीदार बदलले, त्या रात्रीपुरते....
या घटनेनंतर झालेल्या त्यांच्या भावविश्वातील बदलाचे कांगोरे, मानसिक अंदोलने आणि आयुष्यात झालेले बदल वाचतांना वाचक शहारुन जातो.
वकिलाच्या पत्नीला भयंकर अपराधी वाटतं, खरं तर पहिली मुलगी झाल्यावर गर्भधारणा झाली नव्हती. ती आई होण्यासाठी असुसलेली होती. तरीही..
डाॅक्टरची पत्नी आपल्याच कोशात हरवते.
स्थिर असते ती फक्त प्रोफेसरची पत्नी..
डाॅक्टरांना आता वाटायला लागतं की तो मोह टाळता यायला हवा होता. त्यांचं पिणं फार वाढतं
वकील आता जास्तीत जास्त वेळ घराबाहेर काढतात.
प्रोफेसरांना हा अनुभव परत अनुभवावासा वाटतो.
सगळ्या पात्रांच्या लैंगिक मनोव्यापाराचे चढते उतरते आलेख. त्यांच्या व्यक्तिगत कामजीवनात आलेलं यश अपयश, एकंदरीत मध्यमवयीन स्री पुरुषांचे कामजीवन, लैंगिकता अशा अत्यंत नाजूक विषयावरचे कथानक असूनही कुठेही अश्लीलता न जाणवु देणं हे लेखकाचं सिध्दहस्तता अधोरेखित करतं.
एक नाजूक विषयावरची अंतर्मुख करणारी कादंबरी.