छपाईची कुळकथा -२

छपाईची कुळकथा - २




लाकडी ठशांचा उपयोग करून चित्रं किंवा पुस्तकाची पानं छापणं या टप्प्यानंतर प्रत्येक अक्षराचा सुटा ठसा बनवून अशा ठशांची हवी तशी जुळणी करणं हा पुढचा टप्पा युरोपमध्येही कुणालाही सहज सुचण्यासारखाच होता. दहाव्या अकराव्या शतकात चीनमध्ये हे काम केलंही गेलं होतं, पण त्यात चिन्यांना खूप अडचणी आल्या होत्या. त्यावेळेच्या चीनमधल्या परिस्थितीपेक्षा पंधराव्या शतकातल्या युरोपमध्ये परिस्थिती अगदी वेगळी होती. हस्तलिखितं लिहिण्यात जाणारा वेळ, तसंच, या कामावर असलेली चर्चची मक्तेदारी या गोष्टी युरोपियन लोकांना नको होत्या. कुणी जर पुस्तकांच्या प्रती काढायची सोपी आणि जलद पद्धत शोधली असती, तर अनेक जण त्यासाठी आर्थिक मदत द्यायला तयार होते. तसंच, अशा प्रकारे तयार केलेली पुस्तकं विकत घ्यायलाही लोक तयार होते. म्हणजेच, भांडवल आणि बाजारपेठ या दोन्ही गोष्टी उपलब्ध होत्या. उणीव होती ती फक्त या दोघांना जोडणाऱ्या तंत्रज्ञानाची!

तंत्रज्ञानाचा विचार केला, तर छपाईसाठी पाच गोष्टी प्रगत होण्याची गरज होती. पहिली गोष्ट म्हणजे अगदी सहजपणे छपाई करता येईल अशा यंत्राची गरज होती. अशी यंत्रंही त्याकाळी निर्माण व्हायला लागली. दुसरी गोष्ट म्हणजे, छपाईसाठी कागद लागणार होता. चांगली गोष्ट म्हणजे कागदाच्या गिरण्या तोपर्यंत युरोपमध्ये पोहोचल्या होत्या. त्यामुळे भरपूर प्रमाणात कागद उपलब्ध होता. तिसरी गोष्ट म्हणजे, धातूच्या ठशाला चिकटेल अशी शाई असणं गरजेचं होतं. हाही प्रश्न फारसा मोठा नव्हताच. चौदाव्या शतकाच्या शेवटी तैलरंगांचा आणि व्हार्निशचा उपयोग चित्रकार करायला लागले होते. पंधराव्या शतकातल्या लिखाणात आणि चित्रांमध्ये तैलरंगांचे संदर्भ यायला लागले होते. या तैलरंगांवरच थोडी प्रक्रिया करून छपाईसाठी शाई बनवणं शक्य होतं. चौथी गोष्ट म्हणजे कागदावर ठसे दाबण्यासाठी लागणारं दाबयंत्र किंवा प्रेस याची गरज होतीं. हातानंच कागद ठशांवर किंवा कागदावर ठसे दाबणं अर्थातच शक्य होतं. पण त्यात फार वेळ गेला असता आणि हे काम कष्टाचं होतं. खरंतर अशा प्रकारचं दाबयंत्र किंवा प्रेस युरोपमध्ये तेव्हा उपलब्ध होतं. पण त्याचा उपयोग दारू बनवताना द्राक्षं चिरडण्याकरता केला जात होता! त्यामुळे त्या यंत्राचं नाव ‘वाइन प्रेस’ असंच पडलं होतं. कागद बनवताना त्यातलं पाणी दाबून काढण्यासाठीसुद्धा या यंत्राचा वापर केला जात असे. तसंच कागदावर नक्षी छापण्यासाठीसुद्धा हा प्रेस वापरला जाई. आता हेच तत्त्व छपाईसाठीही वापरणं शक्य होतं. त्यामुळे बराचसा प्रश्न सुटला होता. पाचवी गरज होती धातूचे ठसे बनवण्याइतक्या धातुशास्त्राच्या प्रगतीची! मध्ययुगात यासाठीचं तंत्रज्ञान काही प्रमाणात प्रगत झालं होतं. वाळूच्या साच्यात धातूचा रस ओतून असे अक्षरांचे ठसे बनवले जायचे. सोनार आणि इतर कारागीर स्वत: बनवलेल्या वस्तूंवर विशिष्ट प्रकारचा ठसा उमटवायचे. तो खरं म्हणजे एक प्रकारचा त्यांचा ट्रेडमार्कच असायचा. छपाईसाठी लागणारं तंत्रज्ञान जरी असं अलग-अलग प्रकारांत आणि कमी जास्त प्रमाणात उपलब्ध असलं, तरी या सगळ्या गोष्टी एकत्र करून त्यांच्यामध्ये सुसूत्रता आणून त्या प्रत्यक्ष व्यवहारात उतरवण्याचं कामही कठीणच होतं. युरोपमध्ये एकाच वेळी अनेक जण यावर प्रयोग करत होते. हे सर्व जण छपाई यंत्रावर काम करत असले, तरी सर्वानुमते त्यांतला पहिला ठरला तो जर्मनीतला जॉन गुटेनबर्ग!

गुटेनबर्गला छपाईच्या शोधानं झपाटलेलं होतं. त्याला पैशांची तमा वाटत नव्हती. त्यानं अनेकांकडून आयुष्यभर ‘भरपूर पैसे कर्जानं घेतले आणि ते फेडले नाहीत’ या कारणानं त्याच्यावर कायम खटले चालायचे. एका चांभारानं त्याला फसवणुकीच्या आरोपाखाली कोर्टात खेचलं होतं. देणेकऱ्यांनीही त्याच्यावर कायम खटले चालवले.

त्या काळात युरोपमध्ये चर्चेस आणि मॉनस्टरीज भरपूर प्रमाणात वाढल्या. तोपर्यंत फक्त चर्चकडेच बायबलच्या प्रती असत. मात्र त्यानंतर ही नवी चर्चेस आणि मॉनस्टरीज यांनाही प्रत्येकाला स्वत:साठी बायबलची प्रत आणि देवाच्या प्रार्थना म्हणायच्या पुस्तकाची स्वतंत्र प्रत हवी असं वाटायला लागलं. अनेक कुटुंबांनांही स्वत:ची बायबलची प्रत हवी होती. त्याआधी श्रीमंतीचं मोजमाप एखाद्याकडे किती जमीन आणि नोकरचाकर आहेत यावर व्हायचं. आता याच श्रीमंतांमध्ये सुसंस्कृत बनायचं वारं शिरलं. सुसंस्कृततेचं मोजमाप म्हणून घरात वैविध्यपूर्ण कलाकृती असाव्यात असं त्यांना वाटायला लागलं. पुस्तकं हा कलेचा एक भाग होता. त्यामुळे प्रत्येकाला स्वत:कडे उच्चभ्रूपणा दाखवण्यासाठी पुस्तकं हवीशी वाटायला लागली. तेव्हा पुस्तकं हस्तलिखित प्रकारात तयार व्हायची. मात्र अशा तऱ्हेनं हस्तलिखितांनी पुस्तकं तयार केली जाण्याचा वेग या मागणीला पुरेसा पडणं शक्यच नव्हतं. त्यामुळे पुस्तकं छापण्याचा वेग वाढणंही गरजेचं होतं. 

वितळलेला धातू ठरावीक आकारांमध्ये ओतून नाणी बनवणं १५ व्या शतकात सर्रास चालायचं. ही नाणी नंतर परत तापवून त्यावर हवा तो शिक्का उमटवला जात असे. ही प्रक्रिया बरीच वर्षं न्याहाळली असल्यामुळे गुटेनबर्गला ती चांगली कळली होती. मात्र या प्रक्रियेतून कागदावर छपाई करण्याचं तंत्र शोधण्यात त्याला बऱ्याच अडचणी येत होत्या. गुटेनबर्गला नाण्यांना वापरतात तसे महागडे धातू वापरून चालणार नव्हतं. धातू वितळवण्यासाठी महागड्या शेगड्याही त्याला परवडणाऱ्या नव्हत्या. गुटेनबर्गनं बऱ्याच प्रयत्नांनंतर सुट्या अक्षरांच्या साच्याचा किंवा टाइपचा शोध लावला. त्यामागची कल्पना अगदीच सोपी होती. पूर्वी एका अख्ख्या पानाचा मिळून एक साचा बनवायचे. त्यानंतर सगळी ओळच्या ओळ कोरून तिचा साचा बनवायचे. त्यावेळी मात्र गुटेनबर्गनं प्रत्येक अक्षरासाठी धातूचा साचा तयार केला. आकडा, अक्षर किंवा विरामचिन्हं यांपैकी प्रत्येकासाठी वेगळे साचे असायचे. गुटेनबर्गनं स्वत: वापरलेल्या साच्यांपैकी एकही साचा आज उपलब्ध नाही. पण गुटेनबर्गने ते साचे बनवायची अशी युक्ती शोधून काढली होती, की तीच पद्धत त्याच्यानंतरही जवळपास शेकडो वर्षं काहीच बदल न करता वापरण्यात आली.

साचे बनवायची अशी पद्धत सुचण्याआधी गुटेनबर्गनं किती प्रकारचे मार्ग वापरून पाहिले असतील, किती वेळा अपयशानं तो खिन्न झाला असेल, यांतलं आज काहीही माहीत नाही. 

१४५५ साली गुटेनबर्गनं आपलं छपाईचं तंत्र वापरून पहिलं बायबल छापलं. पोप पायस- २ यानं एका पत्रात १४५५ च्या मार्चमध्ये फ्रँकफर्टमध्ये बायबलची एक प्रत पाहिल्याचं लिहिलं होतं. त्यामुळे गुटेनबर्गच्या बायबलच्या छपाईचं १४५५ साल ग्राह्य मानलं जातं. यासाठी लागणारा कागद हातकागद (हँडमेड) होता आणि तो इटलीमधून आयात केला होता. या बायबलच्या प्रती प्रत्येक प्रतीला ३० फ्लोरिन्स या दरानं विकल्या गेल्या. ती रक्कम त्याकाळी एका कारकुनाच्या ३ वर्षांच्या पगाराएवढी होती. गुटेनबर्गला त्यासाठी अनेक अक्षरं, आकडे, विरामचिन्हं यांची अशी हजारो चिन्हं लागली असणार. पुस्तकाच्या एका पानासाठी सुमारे १८०० चिन्हं लागतात. गुटेनबर्गच्या बायबलच्या दर पानावर दोन स्तंभ (कॉलम्स) होते. गुटेनबर्गच्या बायबलचं एक पान ३०.७ बाय ४४.५ सेमी होतं. गुटेनबर्गनं ज्यावर बायबल छापलं तो पहिला प्रिंटिंग प्रेस लाकडाचा होता. गुटेनबर्ग दर दिवशी ३०० कागद छापायचा. त्याला सहा प्रेस लागायचे. गुटेनबर्गनं छापलेल्या बायबलच्या दोन खंडांची प्रत्येकी ६४१ पानं होती आणि त्याच्या पहिल्या आवृत्तीमध्ये १८० प्रती छापल्या गेल्या. त्यावेळी छपाईला एवढा वेळ लागायचा, की साचा करून झाल्यानंतर गुटेनबर्गला केवळ छपाईला २-३ वर्षं लागली. या १८० प्रतींमधल्या १३५ प्रती कागदावर आणि उरलेल्या कातड्यावर छापल्या गेल्या. या प्रतींवर श्रीमंत लोकांनी नंतर हातानं लिहिणाऱ्या कारागिरांकडून वरती मथळे, वगैरे काढून त्या सुशोभित करून घेतल्या.

या १८० प्रतींमधल्या आज फक्त ४९ प्रतीच शिल्लक आहेत आणि त्या लंडन, पॅरिस, वॉशिंग्टन आणि मेंझ इथल्या ग्रंथालयांमध्ये आहेत. हे बायबल नेटवर डिजिटल फॉर्ममध्येही उपलब्ध आहे. गुटेनबर्गनं छापलेल्या बायबलच्या ३ प्रतींचा १९७८ साली लिलाव करण्यात आला. त्यांच्यापैकी पहिली प्रत मेंझ इथल्या गुटेनबर्ग म्युझियमनं 18लाख डॉलर्सना,. दुसरी प्रत स्टुटगार्ड इथल्या जर्मनीतल्या ग्रंथालयानं 20लाख डॉलर्सना विकत घेतली; तर तिसरी प्रत अमेरिकेतल्या टेक्सास विद्यापीठानं  24लाख डॉलर्सना विकत घेतली. आजवर जगभरात कुणीही एका पुस्तकासाठी मोजलेली ही सगळ्यांत मोठी किंमत आहे! त्याचा जनक गुटेनबर्ग याला मात्र त्याकाळी यातून फुटकी कवडीही मिळाली नाही!

गुटेनबर्गच्या बायबलमध्ये दर पानावर ४२ ओळी असल्यामुळे त्याला ‘ ४२ ओळींचं बायबल’ असं म्हणतात. गुटेनबर्गनं काढलेलं बायबल हे पहिलंच परिपूर्ण पुस्तक होतं. त्यातल्या छपाईची सुबकता, अक्षरांचा डौल, ओळींमधल्या अंतराचा सारखेपणा अशा अनेक गोष्टी इतक्या चांगल्या होत्या, की पॅरिसमध्ये जेव्हा या पुस्तकाची प्रत आली, तेव्हा ती बघण्यासाठी कार्डिनल मॅझरिन याच्या वाचनालयात लोकांनी तोबा गर्दी केली होती! पुस्तक छापण्याचा गुटेनबर्गचा हा पहिला प्रयत्न नव्हता. त्याआधी गुटेनबर्गनं ‘इंडल्जन्सेस’ छापले होते. तसंच, बायबलमधल्या काही प्रार्थनांची पुस्तकंही छापली होती. मात्र लॅटिनमधलं हे बायबल हे गुटेनबर्गचं पहिलं मोठं यश मानलं जातं. एकूण २५ वर्षं गुटेनबर्ग छपाईतंत्रावर काम करत होता. जग बदलून टाकण्याचं स्वप्न त्यानं तरुणपणी पाहिलं, रात्ररात्र जागून त्या कल्पनेवर काम केलं, त्यात अनेकदा अनुभवलेली निराशा आणि प्रदीर्घ वाट पाहणं, अनेकदा झालेल्या चुकांमधून शिकणं, सततचे पैशांचे ताणतणाव या सगळ्यांवर मात करून त्यानं हे यश मिळवलं होतं! 

संदर्भ - संवाद - अच्युत गोडबोले


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.