२४ सप्टेंबर १५९९ ला लंडन शहरातील फक्त चोवीस व्यापारी एकत्र जमले आणि त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. भांडवल होते सुरुवातीस फक्त बहात्तर हजार पौंड. कंपनीचा उद्देश होता या व्यापारातून शक्य तितका नफा मिळवायचा. पण त्या एका साध्यासुध्या उद्देशापोटीच पृथ्वीवरच्या एका साम्राज्याचा जन्म झाला.
एका नव्या साम्राज्यशाही युगाचाच प्रारंभ झाला. २४ ऑगस्ट १६०० या दिवशी ईस्ट इंडिया कंपनीची पहिली मालवाहू बोट सुरत बंदरास लागली. ब्रिटिशांच्या भारतातील आगमनाचा हाच तो दिवस! त्यावेळी देशावर मोगल सम्राट जहांगीरचा अंमल चालू होता. त्याच्या तुलनेने इंग्लंडची राणी एलिझाबेथ ‘किस झाडकी पत्ती!’ एखाद्या छोट्या संस्थानची राणी!
पण यथावकाश याच व्यापारी कंपनीने हातपाय हालवायला सुरुवात केली. १७५७ च्या प्लासीच्या लढाईनंतर कंपनीचे आसन भक्कमच होऊन बसले. त्या एका विजयापाठोपाठ अनेक विजय मिळवत सर्व भारत त्यांनी पादाक्रांत केला. १८५७ च्या बंडानंतर वाढलेल्या कर्जबाजारीपणाने कंपनीच्या कारभाराची इतिश्री होऊन भारतावर व्हिक्टोरिया राणीची सत्ता निर्माण झाली.
२,००० सनदी नोकर व १०,००० सैन्याधिकारी यांच्या साहाय्याने इंग्रजांनी भारतावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या दिमतीला साठ हजार ब्रिटिश सैनिक व दोन लक्ष भारतीय सैनिक होते. या सार्यांनी तीस कोटी हिंदी जनतेला काबूत ठेवून दिलखुलास कारभार केला. या गोर्या सोजिरांनी भारतीय भूपृष्ठावर उपभोगलेले आयुष्य मोठे रंगतदार व अद्भुत होते. ज्या साहसी व धीरवृत्तीने ते जगले त्याची वाखाणणी केलीच पाहिजे. आपल्या रंगेल आयुष्यात वेगळे रंग आणून त्यांनी आयुष्याची मौज मनमुरादपणे चाखली यात शंका नाही. स्वत:च्या देशातील चालीरीती, वातावरण, सामाजिक व्यवस्था यातील फरक लक्षात घेऊन त्यांनी येथे एका नव्या आयुष्याचा पट उभारला. कामातून मिळालेला फावला वेळ त्यांनी विविध क्रीडा, मेजवान्या, मदिरा, मृगया व मदिराक्षी यांच्या संगतीत मजेत घालविला. स्वदेश सोडून आलेले अनेक येथेच निजधामास गेले. त्यांना आलेले मृत्यू त्यांना स्वत:ला अपरिचित असलेल्या कारणांनी झाले. मलेरिया, कॉलरा अशा जीवघेण्या व्याधीच्या साथींनी पुष्कळांचा बळी घेतला. काही जण शिकारीचा नाद करताना- आपल्याच भक्ष्याचे भक्ष्य बनले. वाघ, हत्ती यांची शिकार करता करता ते स्वत:च त्यांची शिकार बनले. त्यांत अधिकारी, कारकून, सैनिक, परिचारिका अशा विविध व्यावसायिकांचा समावेश होता. मात्र त्याबद्दल कोणाही इंग्रजाने कसलीही कुरकुर केली नाही. उलट भारतात येताना ‘परमेश्वराने सत्ता गाजविण्यासाठीच आपला वंश निर्माण केला आहे’ असा सार्थ अभिमान बाळगून प्रत्येक जण भारतीय भूमीवर पाऊल ठेवायचा, मोठ्या मिजाशीत अधिकार गाजवायचा, मनमुराद मौज करायचा आणि कसलीही हळहळ न करता जगायचा. ब्रिटिशांनी भारतावर राज्य केले. दंगेखोर शाळकरी पोरांवर एखादा पंतोजी जशी जरब बसवतो, तशी वागणूक त्यांनी प्रजाजनांना दिली. स्वत:चे हितसंबंध उत्तम प्रकारे सुरक्षित राहतील याची काळजी त्यांनी घेतली. शासक म्हणून त्यांनी अत्यंत समर्थपणे सत्ता गाजवली. शेवटपर्यंत सत्तेचा आसूड आपल्याच हातात राहील याची दक्षता घेतली.
पहिल्या महायुद्धात सहा लक्ष ऐंशी हजार इंग्रज सैनिक धारातीर्थी पडले. तेथून भारताविषयीच्या कल्पनारम्य आकर्षणाची अखेर होत गेली. सनदी नोकरीत इंग्रज तरुण रस घेईना. हळूहळू त्या क्षेत्रात भारतीयांना प्रवेश मिळू लागला. १९४७ च्या सुरवातीला सनदी सेवेत फक्त एक हजाराच्या आसपासच इंग्रज उरले. ब्रिटिश साम्राज्याची ध्वजपताका फडकवण्याचे त्यांचे काम संपुष्टात आणण्याचे मनसुबे लंडनमधील एका गुप्त संभाषणात रचले जात होते. अखेर, कालपुरुषापुढे मान तुकवण्याखेरीज गत्यंतरच नव्हते. लॉर्ड माऊन्टबॅटन यांच्या नेतृत्वाखाली ‘सूर्य कधीही न मावळणारे साम्राज्य’ भारतापुरते का होईना, अस्ताला चालले होते. आणि १५ ऑगस्ट १९४७ साली पुर्णपणे अस्तंगत झाले.
आधारित