डॅम इट आणि बरंच काही

पुस्तकाचे नाव - डॅम इट आणि बरच काही
महेश कोठारे
शब्दांकन - मंदार जोशी






बालकलाकार, नायक, खलनायक, लेखक, निर्माता, दिग्दर्शक, वितरक, दूरदर्शन मालिका निर्माता अशा विविधांगी भुमिका जगलेल्या कलावंताची सहा दशकांची चित्रपट व्यवसायाच्या चढउतारांची, यश अपयशाची, गती प्रगतीची, स्थित्यंतराची ही कहाणी. 

संपूर्ण निराशेच्या काठावरही ज्या उमेदीने स्वतःला कुटुंबाला आणि निर्मिती संस्थेच्या सावरले, पुनश्च उभे केले त्या घटनांच्या ऊन सावल्यांची ही कहाणी आहे. 

काही कटू प्रसंग सांगताना हेतूपूर्वक समोरच्या व्यक्तीचा उल्लेख केलेला नाही. येथे वृत्तीवर भाष्य केले आहे व्यक्तींना दुखावण्याचा हेतू नाही म्हणून. 

आई वडील रंगभूमीवर वावरत असल्याने बालवयातच अभिनय क्षेत्रात आल्यावर आई वडिलांनी शिक्षणास प्राधान्य द्यायला सांगीतल्याने शुटींगसाठी शाळा बुडवली नाही. त्याचमुळे पदवीधर होऊन वकीलीची परिक्षाही पास झाले. काही दिवस कोर्टात वकीलीही केली. 

बालवयात छोटा जवान या सिनेमाने चांगली ओळख दिली तरीही शाळेत जातांना आई वडील त्यांना बसने शाळेत पाठवायचे. 

पुढे निर्माते बनल्यावर पहिलाच सिनेमा धुमधडाका चांगलाच गाजला. यासाठी भांडवल उभे करण्यापासून तर प्रदर्शित होईपर्यंत ज्या काही अडीअडचणी आल्या त्याचे सुंदर वर्णन केले आहे. नंतरचे काही सिनेमे यशस्वी झाल्यावर अपयशही आले. का, कसे, मी कुठे चुकलो ह्याचे मंथन प्रामाणिकपणे केले आहे. बॅकेचे कर्ज फेडण्यासाठी मुंबईतले राहते घर विकावे लागले त्यावेळी मनोमन केलेला घर घेण्याचा निश्चय त्यांची मानसिक कणखरपण दर्शवतो. त्यानंतर काही वर्षे भाड्याच्या घरात राहावे लागले. 

लक्ष्मीकांत बेर्डेशी जुळलेली मैत्री नंतर काळाने केलेली ताटातूट हळवं करते. 

सतत काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याच्या ध्यासाने नव्या तंत्रज्ञानासाठी बजेटचा विचार केला नाही. 

टिव्ही मालिकांमध्येही आपलं वेगळपण जपणाऱ्या महेश कोठारेंच्या आत्मचरित्रातून जुन्यात गुंतून न राहणारं, काळासोबत किंबहुना काळाच्याही पुढे चालणारं यश अपयशापेक्षा कामात व्यग्र राहणारं, प्रयोगशील  व्यक्तिमत्त्व समोर येते. 

मागच्या सहा दशकात सिनेमा कसा कसा बदलत गेला हे लक्षात येतं.

जीवनाबद्दल प्रचंड सकारात्मक असलेल्या व बहुपेडी व्यवसायिक व कलात्मक घटनांनी ज्यांचे आयुष्य गजबजले आहे, असे आयुष्य जेव्हा धबधब्याच्या आवेगने बोलू लागते, तेव्हा शब्दांकनकाराचे आव्हान मोठे असते. मंदार जोशी यांनी हे आव्हान लीलया पेलले आहे. 








Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.