क्वीन ऑफ एअर
अमेरिकेतली प्रसिद्ध लेखिका लेडी हीथने लिबर्टी मॅगझिनमध्ये लिहिलेल्या एका लेखावर त्या दिवशी बरीच चर्चा सुरू होती. लेखाचं नाव होतं , ‘ व्हाय आय बिलिव्ह वुमन पायलट कान्ट फ्लाय. तो दिवस होता २० मे १९३२. चर्चा होणं तसं साहजिकच होतं, कारण तोपर्यंत एकट्याने अटलांटिक समुद्रावरून विमान उडवण्याच्या प्रयत्नात कित्येक महिला पायलट्सचा मृत्यू झाला होता. पायलट असलेल्या स्त्रीकडे त्या काळी जरा साशंक नजरेनेच पाहिलं जायचं. ‘एक बाई काय विमान उडवणार! ’असं लोकांना वाटायचं. महिला पायलट्सच्या कौशल्याकडे आदराने पाहिलं जावं ,म्हणून त्यांच्यापैकी कुणीतरी अटलांटिक सफरीचा विक्रम करणं फार महत्त्वाचं होतं. पण करणार कोण ?कारण त्यात मृत्यू होण्याचीच शक्यता जास्त होती. ज्यांनी तो प्रयत्न केला होता त्यांच्या धाडसाला ‘वेडं साहस ’म्हणून हिणवलं गेलं होतं. त्यांना नावं ठेवण्यात स्त्रियाही मागे नव्हत्या. लेडी हीथ त्यातलीच एक होती. आपल्या लेखात तिने महिला पायलट्सवर खूप टीका केली आणि लिहिलं , ‘ महिलांनी अटलांटिक पार करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे... कुणीही असला वेडेपणा करू नये ,अशी माझी विनंती आहे ,कारण तसं करू पाहणार्या किमान डझनभर बायका बुडून मरतील ,असं मला वाटतं.' बहुतेकांना हीथचं मत मनापासून पटत होतं ,
पण एक अपवाद होताच..अमिलिया एयरहार्ट!
बरोब्बर त्याच दिवशी ती एकटीच विमानातून अटलांटिक सफरीला निघाली होती...
काही दिवसांपूर्वी एक दिवस ब्रेकफास्ट करताना अमिलियाने जॉर्जला तिच्या पतीला अगदी अचानक ,पण शांतपणे विचारलं होतं, "मी अटलांटिक सफर केली ,तर तुला चालेल ना ?’’ अमिलिया कधी ना कधी हा प्रश्न विचारणार हे जॉर्जला ठाऊक होतं. करिअरच्या सुरुवातीला अमिलियाने पॅसेंजर म्हणून ही सफर केली होती. या सफरीने तिला बरंच काही दिलं असलं तरी त्या वेळेस तिला विमान चालवता आलं नव्हतं. ती विमानात फक्त बसून होती. आणि ही गोष्ट तिला खुपत होती. अटलांटिक समुद्र पार करणारी पहिली महिला पायलट होणं हे तिचं स्वप्न होतं. अटलांटिक सफर करणार्या पहिल्या पायलटचा मान चार्ल्स लिंडबर्गने मिळवला होता. असाच विक्रम तिला स्वतःच्या नावावर करायचा होता. जॉर्ज तिची इच्छा आणि ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मेहनत घेण्याची तिची तयारी जाणून होता. त्याने होकार दिला आणि जोरदार तयारी सुरू झाली.
उड्डाणाची जय्यत तयारी झाली होती तरी एका गोष्टीवर हवामानावर त्यांचं अजिबात नियंत्रण नव्हतं. हवामानाचा फ्लाइटच्या टायमिंगवर मोठा परिणाम होऊ शकतो. वादळ-वार्याला तोंड देताना टायमिंग पुढे-मागे झालं असतं तर सफरीच्या उद्देशावरच पाणी पडलं असतं पण त्याहीपेक्षा गंभीर गोष्ट म्हणजे ही सफर पूर्ण करण्याच्या प्रयत्नात हवामान आणि तांत्रिक बिघाडामुळे सात महिला पायलट्स मरण पावल्या होत्या. साहजिकच अमिलियाच्या सफरीचं सर्वांना खूप टेन्शन आलं होतं.
उड्डाणासाठी जॉर्ज-अमिलियाने तारीख निवडली होती ,२० मे १९३२. बरोबर पाच वर्षांपूर्वी याच दिवशी चार्ल्सने अटलांटिक समुद्र पार केला होता. १८ आणि १९ तारखेला हवामान खूपच वाईट होतं. अगदी २० तारखेलाही सकाळपासून खराब हवामानामुळे उड्डाण करता येत नव्हतं. सर्वांचं टेन्शन क्षणाक्षणाला वाढत होतं. दुपारी अडीच वाजता अचानक आकाश स्वच्छ झालं. ते पाहून अमिलियाने पटकन आवरलं. सव्वातीन वाजेपर्यंत व्हेगा या विमानाचीही तयारी पूर्ण झाली आणि ते घेऊन अमिलिया हार्बर ग्रेस विमानतळाकडे निघाली. त्या क्षणाचं वर्णन करताना अमिलिया लिहिते , ‘ धोकादायक गोष्टीची तयारी करणं वेगळं आणि ती गोष्ट प्रत्यक्षात करणं वेगळं! प्रत्यक्षात करताना जरा जास्तच धीर लागतो. तुमचं सगळं धैर्य पणाला लागतं.
विमानतळावर विमानाची परत एकदा तपासणी करायची होती. तपासणी पूर्ण होईपर्यंत संध्याकाळचे ६.३० वाजले. आता कुठल्याही क्षणी अमिलिया टेक ऑफ घेणार होती. या प्रसंगाची आठवण बर्न्टने आपल्या डायरीत नोंदवली आहे. तो लिहितो , ‘ मी तिला हवामानाचा अंदाज दिला अटलांटिकवरून जाताना कशाकशाशी सामना करावा लागू शकला असता याची कल्पना दिली. ती माझ्या सूचना शांतपणे ऐकत होती. बोलून झाल्यावर तिने माझ्याकडे पाहून एक अगदी शांत एकाकी वाटावं असं हास्य केलं आणि विचारलं , ‘ तुला वाटतं ,मी हे करू शकेन ?’
मी पण विचारलं , ‘ पैज लावतेस ?’
ती तशीच शांतपणे विमानापर्यंत गेली ,कॉकपिटमध्ये बसली. इंजीन सुरू करून दोन क्षण थांबली... ‘निघू का ’अशा अर्थी डोकं हलवलं ;आम्ही विमानाचे चॉक्स ओढले आणि तिने भरारी घेतली...
इथून पुढे सगळंकाही अमिलियाचं कौशल्य आणि तिचं नशीब यांवर अवलंबून होतं. सुरुवातीला सगळं ठीक चाललं होतं. विशेष काहीच घडलं नाही ,पण ती वादळापूर्वीची शांतता ठरली. कारण तीन तासांनंतरच विमानाचं अल्टीमीटर बिघडलं. विमान किती उंचीवर उडतंय हे अल्टीमीटरमुळे समजतं. खरंतर ते बिघडण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे त्यानंतर अमिलिया जितक्या वेळा विमान वर-खाली करत होती त्यावरून तिला विमानाच्या उंचीचा अंदाज बांधावा लागत होता. ढगांची दाटी झाली ,वादळ किंवा पाऊस आला तर कॉकपिटसमोर पाहून विमान चालवणं शक्य होत नाही. ते आतल्या इन्स्ट्रुमेंट्सच्या मदतीने चालवावं लागतं आणि त्यासाठी अल्टीमीटर खूप महत्त्वाचा असतो. नेमका तोच बिघडल्याने अमिलियाची पंचाईत झाली. या गोंधळातून ती सावरत नाही तोच तुफान वादळ आणि विजांचा गडगडाट व्हायला लागला. वार्याचा जोर इतका होता की विमान आपोआप पुढे-मागे ढकललं जात होतं. तेवढ्यात विमानाच्या एक्झॉस्ट फॅनमधलं एक पातं निखळलं. वेल्डिंग व्यवस्थित झालं नसल्याने वार्याच्या एकाच तडाख्यात ते निघून आलं. त्यामुळे पंख्यावर ठेवलेल्या इंधनाने पेट घेतला. एव्हाना रात्र झाली असल्यामुळे मिट्ट काळोखात त्या ज्वाळा पाहून अमिलियाच्या जिवाचा थरकाप होत होता. त्यांची भीती कमी होते न होते तोच विमानासमोर ढग जमा झाले. पुढचं काहीच दिसेनासं झालं. तरीही डोळे अक्षरशः ताणून अमिलिया सावकाश विमान चालवत राहिली. अर्धा तास विमान तसंच हळू हळू पुढे जात होतं. थोड्या वेळाने ढग पांगले ,पण तोवर विमानाच्या काचांवर बर्फाचा थर जमा झाला होता ;त्या थराचा विचार करण्याआधीच विमान प्रचंड वेगाने स्वतःभोवतीच गरागरा फिरायला लागलं. तिने विमानावर नियंत्रण मिळवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याचा वेग इतका होता की तिला काहीच करता येईना. कुठल्याही क्षणी ते कोसळेल असं वाटत होतं. खूप वेळानंतर तिने विमानावर कसंबसं नियंत्रण मिळवलं आणि विमान थोडं स्थिर केलं. मग तिने ते खालच्या दिशेने वळवलं. खाली नेण्यामुळे विमानाभोवतीची थंड हवा आपोआप कमी झाली आणि ते गरम हवेच्या संपर्कात आलं. साहजिकच बर्फाचा थर वितळला आणि विमान ताळ्यावर आलं.पण हे सगळं इतकं सोपं नव्हतं. त्या प्रत्येक क्षणात प्रचंड धोका होता. तिने विमान खाली आणलं तेव्हा ते समुद्राच्या लाटांच्या अगदी जवळ होतं. एखाद्या उंच लाटेचा तडाखा बसला असता तर काही खरं नव्हतं पण सुदैवाने असं काही झालं नाही. या क्षणाबद्दल अमिलिया म्हणते , ‘ विमान किती वेळ गोल फिरत होतं ,माहीत नाही... इतकं माहिती आहे की अशा वेळी जे करणं योग्य होतं तेच मी केलं. विमान खाली घेतलं म्हणजे त्यावर जमा झालेला बर्फ वितळलं असतं आणि ते स्थिर झालं असतं ,एवढं मला नक्की उमगलं होतं. ’अल्टीमीटर बिघडल्यामुळे अमिलियाला नेमक्या उंचीचा अंदाज येत नव्हता. धुकं आणि बर्फाच्या थरातून वाट काढत ती पहाटेपर्यंत तशीच विमान चालवत राहिली. दिवस उजाडल्यावर तिला जरा धीर आला. एव्हाना ती लक्ष्याच्या जवळ आली होती. लँड होण्यासाठी दोन तासांचा अवकाश असतानाच आणखी एक घोळ झाला. केबिनमधली इंधनाची टाकी गळायला लागली. अमिलियाच्या खांद्यावरच इंधन ठिबकत होतं. गळती वाढली असती तर कुठल्याही क्षणी विमानात आग लागण्याची शक्यता होती. विमान लवकरात लवकर लँड करणं गरजेचं होतं. प्लॅननुसार दक्षिण बाजूला असलेल्या एका बेटावर तिला विमान लँड करायचं होतं पण त्या बाजूला वादळाची चिन्हं दिसत होती. म्हणून अमिलियाने थोड्या लांबून म्हणजे उत्तरेकडून वळसा घालून ठरलेल्या बेटावर जायचं ठरवलं. ‘आपल्याला ठरलेल्या बेटाचं टोक दिसेल ’असं तिला वळसा घालताना वाटलं. प्रत्यक्षात मात्र ते बेट सोडून ती भलत्याच बेटावर लँड करण्यासाठी घिरट्या घालायला लागली. तिला त्या बेटावर कुठेच एअरफील्ड दिसेना. सगळीकडे नुसती शेतंच होती. इंधनाची गळती सुरूच होती. आणखी थांबणं जिवावर बेतू शकलं असतं ,म्हणून अमिलियाने तसंच लँड करायचं ठरवलं. शेतात चरत असलेल्या गुरांना हटवताना मात्र तिची पुरेवाट झाली. गुरं दुसरीकडे जावीत म्हणून ती आकाशात थोडा वेळ तशाच चकरा मारत राहिली. शेवटी तिने एका कुरणावर आपलं विमान लँड केलं आणि घाईघाईने बाहेर आली. समोर दिसणार्या माणसाला तिने विचारलं , ‘‘ मी कुठे आले आहे ?’’
त्यावर तो म्हणाला , ‘‘ गॅलागर्सच्या कुरणात. ’’
त्या माणसाचं नाव डॅनी मककॅलियन होतं. ते शेतही त्याचंच होतं. समोरून अचानक उतरलेलं विमान आणि त्यातून बाहेर आलेली एक स्त्री हा सगळा प्रकार त्याला अद्भुत वाटला. त्यानंतर थोड्याच वेळात अमिलियाला पाहण्यासाठी सगळं गाव गोळा झालं.
ती संपूर्ण सफर पूर्ण करण्यासाठी अमिलियाला १४ तास ५० मिनिटं लागली. याआधी पायलट्सच्या टीमने हीच सफर १६ तास १२ मिनिटांत पूर्ण केली होती. म्हणजेच अमिलियाने नवा विक्रम रचला होता! एकट्याने अटलांटिक पार करणारी ती दुसरी व्यक्ती आणि पहिली महिला होती. ही सफर दोनदा करण्याचा विक्रमही तिच्या नावावर नोंदला गेला होता. महिलांसाठी अशक्य मानली जाणारी गोष्ट तिने शक्य करून दाखवली होती.