📚ब्लास्फेमी
लेखिका - तेहमिना दुर्रानी
अनुवाद - भारती पांडे
ब्लास्फेमी म्हणजे ईश्वरनिंदा, ईश्वराबद्दल वाईट बोलणारे. कादंबरीचे हे शीर्षक अत्यंत चपखल आहे. धार्मिक सत्तेच्या जोरावर समाजावर अवलंबित अत्याचार करणारे धर्ममार्तंड, त्यांची क्रूरता, ढोंग हे किती पराकोटीचे असू शकते याचे शहारा आणणारे चित्रण "ब्लास्फेमी"त आढळते.
एका सत्य घटनेतून स्फुरलेली ही कादंबरी पराकोटीच्या दुष्टत्वाचे कठोर दर्शन घडवते. रक्तपिपासू धर्मनेत्यांनी भ्रष्ट केलेल्या इस्लामचे स्वरूप कोणतीही लपवाछपवी न करता वाचकांपुढे ठेवण्याचे धाडसाचे काम ही कादंबरी करते.
हीर नावाच्या एका सुंदर तरुणीची करुण कहाणी लेखिकेने अत्यंत उत्कटतेने, प्रभावशाली भाषेत सांगितली आहे.पंधराव्या वर्षी हिर चा विवाह तिच्याहून अठरा वर्षांनी मोठ्या असलेल्या पीरसाई या धर्मगुरुशी होतो आणि तिच्यावर जणू वेदनेचा डोंगर कोसळतो. अनन्वित अत्याचार करत पीरसाईने हीरला अध:पतनाच्या अंतहीन खाईत नेऊन ठेवले आहे. परंतु ज्या भयंकर दुःस्वप्नामध्ये हीर कैद झालेली आहे, ते दुःस्वप्न तिचे एकटीचे नाही; तर जवळपास सगळ्याच स्रियांचे आहे. त्यांचे माणूस म्हणून जगणेच नाकारणारे आहे.
धर्माच्या नावाखाली पीरसाई जे काही करतो ते बघतांना हिर चक्रावून जाते स्वतःला धर्माचा ठेकेदार समजणारा पीरसाई धर्माच्या नावाखाली अमाप संपत्ती लुबाडतो, वासनेचा नंगानाच करतो. धार्मिक बुरख्याआड आपली काळकृत्ये लपवतो.
पीरसाईच्या हवेलीमध्ये रोज दिवस-रात्र वर्णन करता येणार नाहीत, अशी भयंकर क्रूर कृत्ये केली जातात त्यातून दहा बारा वर्षांच्या लहान मुलीही सुटत नाही.इतकच नाही तर तो त्याच्या सख्ख्या मुलीचीही अपेक्षा ठेवतो.
या नरकातून बाहेर पडण्यासाठी हिर एक धाडसी निर्णय घेते. परंतु जेव्हा हीर आपल्या मुलाला हळूहळू पीरसाई बनतांना बघते तेव्हा मात्र ती अत्यंत हताश होते.
या कादंबरीचा खलनायक जरी मुस्लिम असला तरी तो धर्मसत्तेच्या जोरावर अनाचार माजवणाऱ्या जागतिक स्तरावरील धर्ममार्तंडाचा प्रतिनिधी वाटतो.