कोमा

पुस्तकाचे नाव - कोमा
लेखक - डॉ. राॅबिन कुक
अनुवाद - रविंद्र गुर्जर





ऐंशीच्या दशकात वर्तमान पत्रात एका अवयव दानाची जाहीरात बघितल्यावर ही कादंबरी सुचली. डॉ. राॅबिन कुक ह्यांची ही पहिलीच कादंबरी असून यावर सिनेमा सुध्दा बनलाय. 

कादंबरी जरी जुनी असली  तरीही यातील घटना आणि संदर्भ आजही तितकेच जीवंत वाटतात. 

बोस्टन मेमोरियल या सरकारी  हाॅस्पिटलमधे नेहमीच रुग्णांची गर्दी असायची. सुझान व्हिलर ही तरुणी आपला दोन वर्षांचा पुस्तकी अभ्यासक्रम संपवून रुग्ण सेवेचे प्रात्यक्षिक इथेच सुरू करणार होती. पहिल्या दिवशी तिला जो रुग्ण भेटला तो खेळाडू होता. त्याच्या गुढग्यावर किरकोळ शस्त्रक्रिया होणार होती. पण शस्त्रक्रियेसाठी भुल दिल्यावर काही गुंतागुंत झाल्यामुळे तो कोमात गेला होता. आदल्या आठवड्यात गर्भाशयाची शस्त्रक्रिया करण्यात येणाऱ्या एका तरुणीला सुध्दा अशाच प्रकाराला सामोरं जाऊन ती सुध्दा कोमात गेली होती. 

सुझानने तपास केल्यावर समजलं की वर्षभरात अशी अवस्था सहा रुग्णांची झाली होती. ह्यांची अशी अवस्था का व्हावी, त्यामागे काही वैद्यकीय आजार किंवा एखादं ऍलर्जी निर्माण करणारं औषधाचा वापर झाला होता का..सगळ्यांची वयं पंचवीस ते बेचाळीसच्या दरम्यान होती. सगळेच जण साध्या किरकोळ शस्ञक्रियेसाठी भरती झालेले होते. कोणत्याही गंभीर आजारांचा पुर्व इतिहास नसतांना भुल दिल्यावर अशी गुंतागुंत होऊन रुग्ण कोमात जाणं हे चक्रावणारं होतं. या सगळ्या रुग्णांचे  मेंदू अचेतन झाले होते. पण इतर अवयव सुस्थितीत होते. अधिक उपचारासाठी यातील काही रुग्णांना जेफरसन इन्स्टिट्यूट या अत्याधुनिक हाॅस्पिटलमधे हलवलं होतं. 

अचानक सुझानच्या लक्षात आलं की आठ नंबरच्या ऑपरेशन थिएटर मध्ये या शस्त्रक्रिया होणार होत्या. साध्या, सरळ, किरकोळ शस्त्रक्रियासाठी हे थिएटर वापरलं जात होतं. इथेच सगळी गुंतागुंत होत होती. इतर कोणत्याही ऑपरेशन थिएटरमध्ये शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाच्या बाबतीत कोणतीही गुंतागुंत होत नव्हती. आता तिने आपलं लक्ष त्या ऑपरेशन थिएटरवर एकवटलं. 

सुझान जसजशी या प्रकरणाच्या खोलात जाऊ लागली तसतसा तिला वरिष्ठांची बोलणी खायला लागत होती. विरोध व असहकार वाढत होता. तिने यापासून दुर राहावं म्हणून तिला वेगवेगळ्या पद्धतीने समजवण्यात आले. तरीही तिने तपासाचा हट्ट सोडला नाही म्हणून शेवटी तिला बोस्टन मेमोरियल हाॅस्पिटलमधून काढून टाकण्यात आलं. एका व्यक्तीने तिला धमकी दिली होती. हे प्रकरण थांबवलं नाही तर तिच्या कुटुंबियांना धोका निर्माण झाला होता. तरीही तिने जेफरसन इन्स्टिट्यूट ला चोरटी भेट दिल्यावर तिला जे समजलं ते अत्यंत भयावह होतं. 

त्यानंतर लगेचच तिच्यावर जीवघेणा हल्ला झाला. त्यातून ती नशीबाने बचावली.... 

वैद्यकीय व्यवसायातील काळी बाजू दाखवणारी थरारक रहस्यमय कादंबरी...... 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.