(३१ ऑगस्ट १९४० - १८ सप्टेंबर २००२).
१९६७ साली आलेल्या मृत्युंजय या कादंबरीने प्रभावी कादंबरीकार म्हणून त्यांची प्रतिमा प्रस्थापित झाली. बहुतेक भारतीय भाषांतून ती अनुवादिली गेली. तिचा इंग्रजी अनुवादही झाला आणि मृत्युंजयकार ही उपाधीही त्यांना लाभली. या कादंबरीत कर्णाच्या अंतरंगात शिरून त्याच्या मनोविश्वाचा शोध घेण्याचा प्रगल्भ प्रयत्न त्यांनी केला आहे. महाभारताच्या विराट विश्वातून कर्णाला त्याच्या दुःखी, यातनामय आयुष्याला त्याच्या अनेक संदर्भांसह वेगळे करून त्यांनी त्याची प्रतिमा साकारली आहे. सत्प्रवृत्त, समर्पणशील पण स्वाभिमानी पुरुष,मैत्रीसाठी तो आपले सर्वस्व अर्पण करतो. त्याच्या व्यक्तिमत्त्वाची ही प्रकाशमय बाजू त्यांनी समर्थपणे मांडली.
छावा (१९७९)मध्ये जनमानसात संभाजी महाराजांबद्दल निर्माण झालेली नकारात्मक स्वरूपाची प्रतिमा पुसून त्या जागी औरंगजेबाने दिलेल्या क्रूर मृत्युदंडाच्या शिक्षेला धीरोदात्तपणे सामोरे जाणारे, आपले राजेपद जबाबदारीने आणि विवेकाने सांभाळणारे संभाजी महाराज ते उभे करतात. त्यासाठी संभाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि त्यांच्या भोवतालच्या परिस्थितीचा ते मानसशास्त्रीय अंगाने विचार करतात. भारतीय ज्ञानपीठाने ह्या कादंबरीचे हिंदी भाषांतर प्रसिद्घ केले आहे.
श्रीकृष्णाच्या जीवनातले जे चमत्कार सांगितले जातात, ते वगळून श्रीकृष्ण दाखविणे हा युगंधर (२०००) लिहिण्यामागचा त्यांचा हेतू होता. जीवनमूल्य नष्ट होत असताना आणि त्यामुळे सामाजिक विघटनाचा अनुभव येत असताना भारतीय मिथकांचा आणि इतिहासाचा आधार घेऊन मानवी जीवनातील आत्मिक शक्तींचा त्यांनी आपल्या कादंबऱ्यांतून पुरस्कार केला. मृत्युंजय आणि छावा ह्या कादंबऱ्यांची नाट्यरूपेही त्यांनी निर्माण केली. या व्यतिरिक्त सावंतांनी लढत, संघर्ष, मोरावळा अशा अनेक कादंबऱ्या लिहील्या. सावंत यांना अनेक साहित्यपुरस्कार आणि सन्मान मिळाले. मृत्युंजयला मिळालेले काही निवडक पुरस्कार असे: महाराष्ट्र राज्य पुरस्कार (१९६७), न. चिं. केळकर पुरस्कार (१९७२), भारतीय ज्ञानपीठाचा ‘मूर्तिदेवी पुरस्कार’ (१९९५), फाय फाउंडेशन पुरस्कार (१९९६), आचार्य अत्रे विनोद विद्यापीठ पुरस्कार (१९९८). छावालाही महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला (१९८०).
बडोदे येथे १९८३ मध्ये भरलेल्या ‘बडोदे मराठी साहित्यसंमेलना’चे ते अध्यक्ष होते. ( संदर्भ - मराठी विश्वकोश)
बडोदे येथे १९८३ मध्ये भरलेल्या ‘बडोदे मराठी साहित्यसंमेलना’चे ते अध्यक्ष होते. ( संदर्भ - मराठी विश्वकोश)