लेखक - एलिस्टर मॅक्लिन
अनुवाद - अशोक पाध्ये
कोरोना विषाणूच्या दहशतीचा सामना नुकताच अनुभवला आहे. त्याही पेक्षा जबरदस्त विषाणू, जो जगण्याची संधी देतच नाही, त्याच्याशी कसं लढणार....
मुळ कादंबरी १९६४ साली प्रकाशित झाली होती.
द मरडाॅन मायक्रोबायोलॉजीकल रिसर्च एस्टॅब्लिशमेंट या ब्रिटिश लष्करातील संस्थेत शास्रज्ञांनी टायफस, देवी, काॅलरा अशा मानवाला घातक व पिकांनाही मारक असलेल्या रोगांच्या जंतूंच्या भयानक जाती विकसित केल्या होत्या. काही विषाणूंच्या सुध्दा नवीन जाती तयार केल्या होत्या. त्या जाती म्हणजे सैतानाचे दुत समजले जात होते.
एक चमचाभर विषाणू एखाद्या ठिकाणी टाकले तर बारा तासात आजुबाजूच्या कित्येक मैलाचा भुभाग निर्मनुष्य होऊ शकतो. महिनाभरात देश उजाड होवू शकतो.
सबंध जीवसृष्टीचा संहार करण्याची क्षमता असलेल्या या विषाणूंचा वापर मर्यादित स्वरूपातील किंवा सर्वकष युद्धात अत्यंत परिणामकारक होऊ शकतो. मरडॉकच्या सुरक्षा व्यवस्थेचा भेद करून काही माहिती मिळाली तर रशियातल्या क्रेमलिनच्या राजवाड्यातील माहिती आणणे अधिक सोपे वाटेल एवढी मरडॉन मधील सुरक्षा व्यवस्था कडक होती. कागदोपत्री या संस्थेचा उल्लेख मरडॉन हेल्थ सेंटर असा केला जायचा. तिथले काम अगदी गुप्त स्वरूपाचे होते. वाॅर ऑफिसचे त्यावर नियंत्रण असायचे.
असा कडेकोट बंदोबस्त असलेल्या संस्थेत सुरक्षा प्रमुख व एका वरिष्ठ शास्रज्ञाचा खुन होऊन सैतानी विषाणूंच्या कुप्या चोरीस गेल्या. या घटनेमुळे सगळेजण हादरून गेले होते.
ह्याचा तपास पोलिसांसह स्पेशल ब्रांच सोबतच पिएरी कॅव्हेल करणार होते.
पिएरी कॅव्हेल एक वादग्रस्त व्यक्तिमत्त्व होते. सध्या डिटेक्टिव्ह एजन्सी चालवणाऱ्या कॅव्हेल दोन महिन्यापूर्वी मरडाॅकचा सुरक्षा प्रमुख होता. पण तिथून त्याला काढून टाकलं होतं. त्याने सैन्यात नोकरी, MI 6 मध्ये घातपाती दलासोबत काम केल्यावर पोलीस दलात नौकरी केली होती. त्याच्या फटकळ व मनमानी स्वभावामुळे सगळ्या खात्यातून काढलं गेलं होतं. तरीही अतिवरिष्ठ अधिकाऱ्याकडून त्याच्याकडे ही कामगिरी दिली गेली. कारण सध्याच्या सुरक्षा प्रमुखाचा खुन झाला होता, कॅव्हेल च्या अगोदरचा सुरक्षा प्रमुख बेपत्ता होता. त्यामुळे अत्यंत विचाराअंती गुंतागुंतीची सुरक्षा यंत्रणा माहिती असलेल्या कॅव्हेलला तपासात सामील करण्यात आले होते.
अनेक पदरी सुरक्षा असलेल्या संस्थेत आतल्या व्यक्तिचा सहभाग असल्याशिवाय चोरी होऊच शकत नाही हा विचार करून कॅव्हेलने तपासाला सुरुवात केली. एका शास्रज्ञाच्या डोक्यावर भरमसाठ कर्ज होते, त्याच्याकडे संशयाची सुई फिरली. अजून एक होता जो अत्यंत थाटामाटात राहत होता. मिळणाऱ्या पगारापेक्षा ही श्रीमंती मोठी वाटत होती. नंतर कॅव्हेल ला प्रत्येकाचा संशय येऊ लागला. शिवाय वाटत होतं की, भरमसाठ खंडणी मागण्यासाठी सरकारला वेठीस धरण्यासाठी कोणा माथेफिरू चं काम असावं.
माध्यमांना एक पत्र मिळालं होतं, मनुष्यसंहारासाठी काम करणारी मरडॉक संस्था ताबडतोब बंद करावी. सगळ्या इमारती भुईसपाट कराव्यात. अन्यथा सैतानी विषाणूंच्या कुप्या फोडल्या जातील. त्यानंतर जे होईल त्याला सरकार जबाबदार असेल.
यासाठी मुदत होती फक्त छत्तीस तासांची..!
कॅव्हेल आता छत्तीस तासानंतरच झोपण्याचा विचार करु शकत होता.. की, खरच कुप्यातला सैतानी विषाणू मुक्त होऊन सजीवांचा संहार करणार होता.....
सैतानी विषाणूंच्या कुप्याआड अजून काहीतरी कारस्थान रचलं जात होतं हे कॅव्हेलला फार उशीरा लक्षात आलं.
थरारक रहस्यकथांच्या हुकमी पत्त्यांपैकी सगळ्यात मोठा पत्ता म्हणजे कल्पनेच्या पलीकडचे मिळणाऱ्या कलाटण्या. या कादंबरीतही त्या पदोपदी अचानकपणे येतात आणि अनपेक्षितपणे धक्का देतात.
१९६४ साली प्रकाशित झालेल्या या कादंबरीच्या विषयाची दाहकता आजही तेवढीच भितीदायक आहे. कधीही जुना न होणारा विषय....!
अशोक पाध्ये ह्यांनी केलेला अनुवाद नेहमीप्रमाणे उत्कृष्ट.