लेखिका - सुनंदा अमरापूरकर
हे आत्मकथन आहे सदाशिव अमरापूरकर ह्यांच्या पत्नी सुनंदा अमरापूरकर ह्यांचे.
अहमदनगर हे सुनंदाचे माहेर आणि सासर. त्यांच्या आणि सदाशिव अमरापूर अमरापूरकरांच्या जडण घडणीचा महत्त्वाचा काळ या गावातच गेल्यामुळे या पुस्तकाचा सुरुवातीचा बराच भाग नगर न व्यापला जाणं स्वाभाविक आहे तो काळ वाचकांच्या समोर अतिशय बारकाव्यांशी इथे उभा राहिला आहे. शालेय आणि महाविद्यालय जीवन, घराचा भवताल, शेजार पाजार, नातेवाईक, स्नेही यांचे चित्रण करताना लेखिका त्या काळचं सामोरे आलेलं शहरातलं समाज जीवन सुद्धा रंगवते.
वडिलांची नाट्यक्षेत्राशी असलेल्या जवळीकेमुळे त्या काळातील नाट्यजीवन ठळकपणे समोर येतं. शाळा काॅलेज मध्ये असतांना रंगमंचावर वावर सुरू झाला होता. अनेक जाणकारांनी, थोरामोठ्यांनी सुनंदाच्या अभिनयाचे कौतुक केले होते. पण वडिलांच्या अकस्मात मृत्यूमुळे घरातली मोठी मुलगी म्हणून आपोआपच जबाबदाऱ्या अंगावर आल्या. त्या समर्थ पणे पेलल्या. एल आय सी मध्ये स्वत:च्या गुणवत्तेवर नौकरी मिळवली. लग्नानंतर काही प्रसंगी घरखर्च चालवण्यासाठी या नौकरीचा मोठा हातभार लागला.
त्याच गावात सदाशिव अमरापूरकरांचं कुटुंब राहत असल्यामुळे शालेय जीवनापासून एकमेकांच्या कुटुंबाची माहिती परस्परांना होती. कॉलेजमध्ये असताना नाट्य क्षेत्रात या दोघांमध्ये विशेष स्नेह निर्माण होऊन ते नातं कसं विकसित होत गेलं हे वाचतांना भारावून जातं. प्रकरण लग्न पर्यंत येताना आलेल्या काही अडचणी विषयी लेखिका मोकळेपणाने सांगते.
लग्नानंतर करमरकरांच्या घरातून निघून अमरापूरकरांच्या घरात गेल्यावर पतीचा सहवास फार कमी मिळाला. सदाशिव च्या नाटकाच्या निमित्ताने नगर , पुणे मुंबई वाऱ्या होत राहील्या. नाव मिळत होतं. पण पुरेसा पैसा मिळत नव्हता. तीन मुली झाल्यावर किती दिवस पती जवळ नसतांना सासरी भार बनून राहायचं या विचाराने अगदी हट्टाने बदली मुंबईला करून घेतली. तेव्हा सदाशिवचं लक्ष न व्यवहारात होतं ना घरात.
अशातच अर्धसत्य प्रदर्शित झाल्यावर सदाशिव अमरापूरकर एका रात्रीत स्टार झाले. मग मात्र जगणं थोडं सुसह्य झालं.
चांगल्या ठिकाणी फ्लॅट घेता आला. तो फ्लॅट घेतांना विजय तेंडुलकर व श्रीराम लागुंनी मोलाची मदत केली होती.
आर्थिक स्थिरता आल्यावर , मुली मोठ्या झाल्यावर आतला आवाज खुणावू लागल्याने एका पुस्तकाचा मराठी अनुवाद केल्यावर त्यातलं आव्हान स्वीकारून अनेक पुस्तकांचा मराठीत अनुवाद केला.
पैकी "डिसऍपीअरींग डाॅटर" ला उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार मिळाला "मी सायुरी" ला सुद्धा बेस्ट पब्लिकेशन अवॉर्ड मिळाला.
अर्धसत्य मधल्या रामा शेट्टीच्या भूमिकेमुळे जगाने त्याच्यावर मारलेला खलनायकाचा शिक्का पुसला गेला नाही त्यामुळे खऱ्या अर्थाने विविधरंगी भूमिका त्याच्या वाट्याला येऊ शकल्या नाहीत. ज्या आल्या त्यात त्यांने उत्कृष्ट रंग भरले पण त्या संख्येने फारच थोड्या होत्या. सगळ्यांना त्याच्यातला विलनच पाहिजे होता. चित्रपटात तोच तोच दुष्टपणा करण्याचा त्याला खूप वीट येऊ लागला होता त्या पाई त्याने अनेक भूमिका नाकारल्या. चांगल्या भूमिका मिळवण्यासाठी संबंधितांचा लांगून चालन करणं, प्रसंगी कोणत्याही तडजोडी करून पैसे कमावून वाटेल त्या खालच्या थरालाही जाणं हे त्याच्या स्वभावात नव्हतं, त्याने कधी केलंही नाही आणि त्याला जमलंही नसतं त्याचप्रमाणे काही मिळवण्यासाठी एखाद्या गटात सामील होणे कुणाचा टिळा लावून घेणे त्याला पूर्णपणे अमान्य होतं.
उत्तरार्धात सदाशिव अमरापूरकरांनी अनेक संस्थाना आर्थिक मदत केली. सहकलाकारांच्या मदतीने खास शो आयोजित करुन मिळालेला सगळा नफा त्या संस्थांना देऊन टाकला.
हे आत्मकथन सुनंदा अमरापूरकर ह्यांचे आहे याची पानोपानी जाणीव होत राहते. वडील गेल्यावर आजारी आईला मदत म्हणून केलेल्या एल आय सी च्या नौकरीने अडचणीच्या कालखंडात आधार दिला. नवऱ्याची अनियमित कमाई असतांना केवळ या नौकरीच्या आधारावर त्यांनी मुंबईत येण्याचा हट्ट धरला, पुराही केला. सडक च्या यशानंतर आर्थिक सुबत्ता आल्यावर सतरा वर्षे केलेली नौकरी सहजगत्या सोडून दिली. पुढे स्वत:साठीही वेळ दिला. एका प्रसिद्ध यशस्वी अभिनेत्याची पत्नी, जीने स्वत:चं स्वतंत्र अस्तित्व सिद्ध केलं
अशी ही खुलभर दुधाची कहाणी सदाशिव अमरापूरकर च्या एक्झिट ने शेवटाला गेलेली.