(४ जानेवरी १९०९ - २२ मार्च १९८४ ) आधुनिक मराठी साहित्यिक, सौंदर्यमीमांसक, पत्रकार व विचारवंत. आजकालचा महाराष्ट्र (१९३५) हे त्यांचे पहिले पुस्तक त्यांनी श्री. रा. टिकेकर ह्यांच्या सहकार्याने लिहिले. त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या ग्रंथांत कलेची क्षितिजे, मर्ढेकरांची सौंदर्यमीमांसा, पाटणकरांची सौंदर्यमीमांसा, आस्वाद, वामन मल्हार आणि विचारसौंदर्य ह्यांसारख्या समीक्षात्मक आणि सौंदर्यशास्त्रविषयक ग्रंथांचा समावेश होतो. नवे जग नवी क्षितिजे , अगस्तीच्या अंगणात, उडता गालिचा, तोकोनोमा, हिरवी उन्हे ही प्रवासावर्णनेही त्यांनी लिहिली आहेत.
व्यक्तिवेध या नावाने त्यांनी लिहिलेली शब्दचित्रे १९७३ मध्ये प्रसिद्ध झाली. निळे दिवस हा त्यांचा वेचक कथांचा संग्रह. पाध्ये यांचे रसिक, बहुश्रुत आणि कल्पक व्यक्तिमत्त्व त्यांच्या प्रवासवर्णनांतून प्रभावीपणे प्रकटले आहे. त्यांनी लिहिलेल्या कथा मुख्यतः वातावरणप्रधान आणि मनोविश्लेषणात्मक आहेत.
एक विचारवंत म्हणून पाध्ये यांनी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर महत्त्वाचे लेखन केले आहे. त्यातील ग्रंथनिविष्ट लेखनात समाजवादाचा पुनर्जन्म , आणि युगोस्लाव्हिया (इंग्रजी) ह्यांचा उल्लेख करावा लागेल.
१९५० मध्ये झालेल्या गोमंतक साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. १९५२ मध्ये मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले.
( संदर्भ - मराठी विश्वकोश)