( १७ एप्रिल १८९१ - २१ मार्च १९७३ )
ज्ञानकोश मंडळाने मराठीचा शब्दकोश तयार करावा अशी अनेकांची इच्छा होती, पण मंडळाला हे शक्य नसल्याने दातेंनी हे काम मनावर घेऊन शब्दकोश निर्मितीसाठी अन्य संपादकांसोबत स्वतंत्र संस्था स्थापन केली.या कोशाबद्दलची
त्यांची आस्था आणि कळकळ प्रत्येक खंडासाठी लिहिलेल्या प्रस्तावनेतून दिसते.
आधुनिक कोशशास्त्राप्रमाणे कोश तयार करायचे म्हटले, तर हे काम अनेक दशके चालले असते. पण तेवढा वेळ, तेवढे अर्थसाह्य आणि तेवढ्या संख्येने भाषाशास्त्रज्ञ उपलब्ध नसल्याने कमीत कमी वेळात जास्तीत जास्त काम करून हा कोश बनवण्याचे आव्हान होते. कोशासाठी विचारात घेतले गेलेले साहित्य आणि बोली यांचा पसारा प्रचंड मोठा असूनही कोशाचा पहिला खंड त्यांनी कर्वे यांच्यासोबत केवळ चार वर्षांमध्ये प्रसिद्ध केला. १९३२-१९३८ या काळात सात खंडांचा महाराष्ट्र शब्दकोश प्रसिद्ध झाला. या कोशांच्या अभ्यासपूर्ण प्रस्तावना महाराष्ट्र भाषाभ्यास (१९३८) यात दात्यांनी संगृहीत केल्या.याव्यतिरिक्त ‘सुलभ विश्वकोश’ (६ भाग, १९४९-१९५१), ‘महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश’ (२ खंड, १९४२, १९४७) आणि ‘शास्त्रीय परिभाषा कोश’ (१९४८) हे प्रसिद्ध केले.
दाते यांनी रा.त्र्यं. देशमुख यांच्या सहकार्याने ‘महाराष्ट्रीय वाङ्मयसूची’ (१९१९) तयार केली. कर्वेंसमवेत ‘डॉ. केतकरांचे सान्निध्य’ (१९४६) हे केतकरांचे लघुचरित्रही त्यांनी लिहिले आहे. ‘पिता-पुत्र संबंध’ (१९४३) या नावाचे सामाजिक लेखनही त्यांनी केले. भाषाशास्त्रातील विद्वत्तेमुळे भारतीय राज्यघटनेचे हिंदी व मराठी अनुवाद करण्यासाठी नेमलेल्या समित्यांचे सभासद तसेच महाराष्ट्र शासनाच्या भाषा सल्लागार मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम सांभाळले. ( संदर्भ - महाराष्ट्र नायक)