लेखिका - लाॅरेन स्क्रग्ज
अनुवाद - प्रणव सखदेव
जीवघेण्या अपघातात हात आणि डोळा गमावलेल्या एका तरुण फॅशन जर्नलिस्टची शाररीक अपंगत्वावर जिद्दीने मात करण्याची कहाणी.
लाॅरेन फक्त तेवीसची होती. नुकतच तिने लोलो हे ऑनलाईन फॅशन मॅगझिन चालू केलं होतं. डिसेंबर महिन्यातील ख्रिसमसची रोशनाई बघण्यासाठी मित्राच्या छोट्या विमानातून भरारी मारली. खाली उतरल्यावर मात्र काही क्षणातच लाॅरेनला विमानाच्या प्रोपेलरचा फटका बसला आणि ती बेशुद्ध झाली. हाॅस्पिटलमध्ये दाखल करेपर्यंत खूप रक्तस्त्राव झाला होता. सबंध शरीर रक्ताळलेलं होतं, विषेशतः डोकं, आणि हात तुटून वेगळा झाला होता.
हाॅस्पिटलमध्ये एकाच वेळी तिच्यावर एकापेक्षा जास्त शस्त्रक्रिया झाल्या. डाॅक्टरांचा एक गट मेंदूवर शत्रक्रिया करीत होता. कवटीचे काही तुकडे मेंदूत घुसले होते. त्याचवेळी डाॅक्टरांचा दुसरा गट तिच्या हातावर शस्त्रक्रिया करीत होता. दुसऱ्या दिवशी दोन तुकडे झालेल्या डोळ्यावर शस्त्रक्रिया झाली.
तिचं जीवंत राहणं हा एक मोठा चमत्कार होता.
या अपघाताची मिडियाने दखल घेऊन लाॅरेनला प्रसिद्ध केले. त्यामुळे शुभेच्छांसोबतच आर्थिक मदतीचा ओघ वाहू लागला.
काही महिन्यांनी तिने पुर्ववत कामाला सुरुवात केली तेव्हा अगोदर नकली डोळा आणि हात लपवायची. नंतर मात्र सत्याचा स्विकार करून जशी आहे तशी सगळ्यांनाच सामोरी गेली.
या संकटाच्या परिस्थितीत लॉरेनचे आई-वडील, बहीण, व मित्रपरिवार खंबीरपणे पाठीशी उभा राहिला. लॉरेनच्या कुटुंबीयांनी देखील घडलेली कथा आपापल्या दृष्टिकोनातून सांगितली असल्याने त्यांचा संघर्ष आणि समोर उभ्या ठाकलेल्या आव्हानावर त्यांनी केलेले मात हे सगळं ज्या पद्धतीने या पुस्तकातून सांगितलं ते खरंच प्रेरणादायी आणि वाचनीय आहे.
लाॅरेनच्या अपघाता अगोदर तिच्या आई वडिलांच लग्न. नंतर झालेला घटस्फोट, कालांतराने परत एकत्र येणं, तिच्या जुळ्या बहिणीचा काहीसा बेधडकपणे, हे वाचतांना आपणही या कुटुंबाचा भाग होऊन जातो.
या पुस्तकाची अर्पण पत्रिका खास आहे " आम्हाला आमच्या संकटकाळात आधार देणाऱ्यांना आम्ही हे पुस्तक अर्पण करीत आहोत. त्याखेरीज जगभरात ज्यांच्या वाट्याला दुःख आलं आहे आणि जे अशा लोकांसाठी झटत आहे अशा सर्वांना आम्ही हे पुस्तक अर्पण करीत आहोत. एखादा डोळा किंवा अवयव गमावला असला तरी दैनंदिन जीवनात या संकटाशी झुंज देणाऱ्या सर्व हिरोज साठी हे पुस्तक आम्ही अर्पण करीत आहोत."
"स्टिल लोलो" या पुस्तकाचा प्रणव सखदेव यांनी केलेला अनुवाद अगदी ओघवता आहे. पात्रांची व स्थळांची नावे सोडली तर आपण अनुवादित पुस्तक वाचतो आहे हे लक्षातही येत नाही. इतका सुरस अनुवाद झाला आहे.