लेखक - आर के नारायण
अनुवाद - सरोज देशपांडे
मालगुडी गावात राहणाऱ्या श्रीरामचे वडील मेसोपोटेमिया मध्ये इंग्रजांच्या वतीने लढताना मृत्यू मुखी पडले होते. आईचा चेहराही त्याला आठवत नव्हता. आजीने त्याला वाढवले होते आणि वडिलांच्या मृत्यूनंतर मिळणारे पेन्शन त्याच्यासाठी जमा करून त्याच्या विसाव्या वाढदिवसाच्या दिवशी बॅंकेत त्याच्या नावावर केले.
गावात फिरतांना एक मुलीने श्रीरामकडे देणगी मागीतली. मालगुडी मध्ये गांधीजी येणार होते. त्यांच्या सभेसाठी, व इतर खर्चासाठी स्वयंसेवक वर्गणी जमा करीत होते. तारुण्यसुलभ आकर्षणामुळे त्याच्या मनात परत त्या मुलीला बघण्याची, भेटण्याची इच्छा झाल्याने तो दुसऱ्या दिवशी त्यांच्या शिबीरात गेला. तिथे गांधीजींची भेट झाली. जर ती मुलगी त्याला शिकवणार असेल तर तो स्वयंसेवक व्हायला तयार होता. गांधीजीसमोर तिने या गोष्टीला मान्यता दिली.
तिचे नाव होते भारती. १९२० च्या आंदोलनात तिचे वडील मृत्युमुखी पडल्यावर गांधीजींची मानलेली मुलगी म्हणून तिचे पालनपोषण केले. ती लोकांना सुतकताई करायला शिकवायची, गांधीजींचे विचार समजयची, खखेडोपाडी स्वच्छतेचं महत्त्व सांगायची आणि प्रत्येक मुक्कामी गांधीजींना हवं नको बघायची.
भारतीने पहिला धडा शिकवला तो म्हणजे कधीही खोटं बोलायचं नाही. जाणतेअजानते पणे झालेली कितीही छोटी असो वा मोठी चुक कबूल करायची.
इथून सुरू होतो श्रीरामचा देशासाठी काहीतरी करून दाखवण्याचा प्रवास. सुरुवातीला शारीरिक श्रम जड जातात. हळूहळू तो रुळतो. सुतकताई करून स्वतः चे कपडे बनवतो.
लोकांच्या मनात देशप्रेमासोबतच आसपास असणाऱ्या लोकांबद्दल प्रेमभावना जागवतो.
काही दिवसांनी एका आंदोलनात गांधीजींच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन अनेक स्वयंसेवक स्वतःला अटक करवून जेलमध्ये जातात. भारतीला सुध्दा जेलमध्ये टाकले जाते. इथे मात्र श्रीरामची द्विधा परिस्थिती होऊन तो आजीची विचारपूस करण्यासाठी घरी जातो. तिथे वेगळ्याच परिस्थितीला त्याला तोंड द्यावे लागते. त्याला मार्गदर्शन करायला भारती नसते. अहिंसा, सत्याग्रहाच्या मार्गावरून भरकटत जाऊन तो ही जेलमध्ये जातो. जेलमध्ये त्याला सत्याग्रहींचा वर्ग मिळत नाही. आपण अहिंसेचा मार्ग सोडला नसता तर...या विचाराने विमनस्क होऊन तो भारतीला पत्र लिहितो. ती त्याला दिल्लीला बोलवते.
एक सर्वसाधारण विचारशक्ती असलेल्या तरुणाचे मनोव्यापार, आणि गांधीजींच्या सहवासात राहून स्वच्छ, निर्मळ मनाची पण तितकीच कणखरपणा दाखवणाऱ्या भारतीचे व्यक्तिचित्र अगदी नेमकेपणाने रेखाटले असून बेचाळीसच्या अंलोलनापासून देशला स्वातंत्र्य मिळण्यापर्यंतचा, गांधीजींच्या हत्येपर्यंतचा काळ उभा केला असून गांधीजी अधे मधे येतात.कथानकाचा केंद्र बिंदू भारती आणि श्री रामभोवती फिरत राहतो. काही धनिक स्वातंत्र्य सैनिकांना कशी छुपी मदत करायचे हे ही दर्शविले आहे. तर देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे जेलमध्ये गेल्यावर त्यांची घरे बळकावणारेही दिसतात.