(३१ मार्च १८४३ - २ नोव्हेंबर १८८५).
मराठीतील पहिले श्रेष्ठ संगीत नाटककार. संपूर्ण नाव बळवंत पांडुरंग किर्लोस्कर. अण्णासाहेब स्वतः चांगले नट व दिग्दर्शक होते. महाराष्ट्रात संगीत नाटकांचे नवे युग त्यांनी निर्माण केले. इतकेच नव्हे, तर उत्तम संगीत नाटके कशी असावीत, याचा आदर्श घालून दिला. अण्णासाहेबांनी काव्यरचनाही बरीच केली आहे. पौराणिक नाटक मंडळ्या व कीर्तनकार यांना त्यांनी आख्याने रचून दिली. त्यांना कानडी, उत्तर हिंदुस्थानी आणि मराठी (लावणी इ.) गाण्यांच्या अनेक चाली अवगत होत्या व ते शीघ्रपणे कवने रचू शकत असत. त्यांनी दक्षिणा पाईज कमिटीने बक्षीस लावल्यावरून स्पर्धेसाठी शिवाजी महाराजांवर पाचशे आर्यांचे दीर्घकाव्य रचले होते.
कालिदासाच्या अभिज्ञानशाकुंतल या नाटकाचे भाषांतर केले. स्वतः ची पदे घालून उत्तम नटसंच मिळवून ते रंगभूमीवर आणले. (१८८०)
किर्लोस्कर नाटक मंडळी’ ची त्यांनी स्थापना केली. त्यानंतर सुभद्राहरणावरील संगीत सौभद्र हे नाटक स्वतंत्रपणे त्यांनी लिहिले (१८८२). त्यांच्या सर्व नाटकांत हेच नाटक अधिक लोकप्रिय आहे. महाराष्ट्रात १९४३ मध्ये साजरी झालेली त्यांची जन्मशताब्दी व त्यांच्या निधनानंतर किर्लोस्कर नाटक मंडळीने पुणे येथे बाधलेले किर्लोस्कर नाटकगृह’ या दोन घटना त्यांच्या सहकाऱ्यांचे व मराठी रसिकांचे त्यांच्यावर केवढे प्रेम होते याची साक्ष देतात. त्यांच्या सर्व लेखनाचा संग्रह समग्र किर्लोस्कर या नावाने प्रसिद्ध करण्यात आला आहे.
( संदर्भ - मराठी विश्वकोश)