(३ एप्रिल १८८२–२१ जून १९२८). लोकप्रिय मराठी कादंबरीकार. खरे नाव द्वारकानाथ माधव पितळे.शिकारीच्या छंदात एका उंच कड्यावरून ते खाली कोसळले आणि त्यांच्या कमरेखालील भाग लुळा झाला. उपचारार्थ इस्पितळात असताना त्यांना वाचनाची आवड उत्पन्न झाली आणि अनेक इंग्रजी-मराठी ग्रंथांचे त्यांनी वाचन केले. त्यातूनच लेखन करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. सुरुवातीला त्यांनी काही इंग्रजी लेख लिहिले आणि पुण्याच्या डेक्कन हेरल्ड ह्या वृत्तपत्रातून ते प्रसिद्धही झाले.प्रेमवेडा ही त्यांची पहिली कादंबरी १९०८ मध्ये प्रकाशित झाली. त्यानंतर सामाजिक आणि ऐतिहासिक मिळून तिसांहून अधिक कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या.
नाथमाधवांनी आपल्या सामाजिक कादंबऱ्यांतून काही प्रश्नांची चर्चा बोधवादाच्या अंगाने करण्याचा प्रयत्न केला. ते ते स्त्री शिक्षणाचे पुनर्विवाह चे पुरस्कर्ते होते. आपल्या लिखाणातून त्यांनी नेहमीच बालविवाहातून निर्माण होणाऱ्या समस्या वाचकांपुढे मांडल्या. हेमचंद्र रोहिणी , रायक्लब अथवा सोनेरी टोळी , देशमुखवाडी , विमलेची ग्रहदशा अशा अन्य काही सामाजिक कादंबऱ्याही त्यांनी लिहिल्या. तथापि त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्यांनी–विशेषतः हिंदवी स्वराज्यविषयक कादंबऱ्यांनी–कादंबरीकार म्हणून त्यांचा लौकिक विशेष वाढविला.स्वराज्याचा श्रीगणेशा , स्वराज्याची स्थापना , स्वराज्याची घटना , स्वराज्याचा कारभार , स्वराज्यावरील संकट , स्वराज्याचे परिवर्तन आणि स्वराज्यातील दुफळी ह्या कादंबरीमालेतून त्यांनी मराठेशाहीच्या उदयापासूनचा कालखंड चित्रित करण्याचा प्रयत्न केला.
नाथमाधवांना अद्भुताचे मोठे आकर्षण होते. वीरधवल (१९१३) ह्या कादंबरीत त्याचा विशेषत्वाने प्रत्यय येतो. त्यांच्या अनेक कादंबऱ्यांप्रमाणे ह्या कादंबरीसही मोठी लोकप्रियता लाभलेली होती. आजतागायत ती कायम आहे.
( संदर्भ - मराठी विश्वकोश)