किरण नगरकर

किरण नगरकर 





( २ एप्रिल १९४२ – ५ सप्टेंबर २०१९ ). 


भारतीय इंग्रजी कादंबरीकार, नाटककार आणि पत्रकार.  नैतिक आवर्तनात अडखळणाऱ्या मानवी संवेदनांची सखोल चिकित्सा हा नगरकरांच्या कादंबरीचा स्थायीभाव आहे. नगरकरांनी आपल्या साहित्यिक कारकीर्दीची सुरुवात ही सात सक्कं त्रेचाळीस  या मराठी कादंबरीपासून केली. कथावस्तू संकल्पनेची पुनर्मांडणी, वास्तववादाचे अनोखे दर्शन, भाषेचा अफलातून सजग वापर, विनोद, निवेदन तंत्र इत्यादी गोष्टींमुळे सात सक्कं  आजही मराठी साहित्यातील एक महत्त्वाची कादंबरी मानली जाते. १९८० साली या कादंबरीचा सेव्हन सिक्सेस आर फॉर्टी थ्री या शीर्षकाने इंग्रजीतून अनुवाद केला गेला. 




रावण अँड एडी (१९९५) ही त्यांची इंग्रजीतील पहिली कादंबरी.नगरकरांच्या दि एक्स्ट्रॉज  (२०१२) आणि रेस्ट इन पीस  (२०१५) या आणखी दोन कादंबऱ्या रावण आणि एडी या नायकांच्या आयुष्यातील पुढचे टप्पे चितारतात. 




धर्मसंस्थांचे सातत्याने होत असलेले विघटन हा नगरकरांच्या चिंतनाचा प्रमुख सूर आहे जो त्यांनी त्यांच्या २००६ साली प्रसिद्ध झालेल्या गॉड्स लिट्ल सोल्जर  या कादंबरीमध्ये विस्ताराने मांडलेला आहे. नगरकरांच्या कादंबरीतील सर्वच स्त्री व्यक्तिरेखा या निडर आणि बंडखोर आहेत. २०१७ मध्ये प्रसिद्ध झालेली नगरकरांची जसोदा  ही कादंबरी नायिकाप्रधान आहे. नगरकरांच्या सात सक्कं त्रेचाळीसला १९७४ चा ह. ना. आपटे पुरस्कार, तर ककल्ड  या कादंबरीला २००१ चा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे. नगरकरांच्या बहुतांश कादंबऱ्या या अनेक युरोपियन भाषांमधून अनुवादित झाल्या आहेत. जर्मन भाषेतून त्यांच्या सर्वच कादंबऱ्या अनुवादित झाल्या आहेत. २०११ साली जर्मनीतील सर्वोच्च मानल्या गेलेल्या ऑर्डर ऑफ मेरीट पुरस्काराने, आणि २०१५ साली टाटा लिटरेचर लाइव्ह लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्काराने  नगरकरांना सन्मानित करण्यात आले आहे. 


( संदर्भ - मराठी विश्वकोश)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.