लेखक - ध्रुव भट
अनुवाद - अंजनी नरवणे
आठरा वर्षे परदेशात लहानचा मोठा होऊन तिथेच शिक्षण पूर्ण केलेला तरूण भारतात आदिवासी जमातीचा अभ्यास करण्यासाठी येतो.
मध्यप्रदेशातील नर्मदा नदीच्या परिसरातील आदिवसी लोकांमध्येच राहायचं, त्यांच्यासाठी छोटीशी शाळा काढायची, त्यांचं रोजचं आयुष्य समजावून घ्यायचं टिपण काढायचे आणि पाठवायची हे त्याच्या कामाचं स्वरूप होतं. आदिवासी कल्याणकेंद्र चालवणारी सुप्रिया त्याची मदत करणार होती. भारतात येण्याअगोदर त्याने थोडेसे आढेवेढे घेऊन हे काम टाळण्याचा प्रयत्न केला होता. पण नाईलाजाने त्याला यावं लागतं.
जसजसा त्याचा स्थानिक अदिवासी लोकांशी, आदिवासी केंद्रात काम करणाऱ्या लोकांशी संबंध येतो, तसतसा त्याची विचारसरणी बदलत जाते.
पहिल्यांदा अपरात्री रेल्वेतून उतरतो तेव्हा पहिला अनुभव मिळतो. दिवस उजाडायला बराच वेळ असल्यामुळे एक आदिवासी तरुणी तिच्या कुटुंबियासह त्याच्या सोबत थांबण्यास तयार असतात. त्याला आदिवासी केंद्रात पोहोचवण्यासाठी तो कोण कुठला याची चौकशी न करता ते मदतीला तयार असतात.
बित्तु व बंगा हे दोन्ही भाऊ कधीही एकमेकांना सोडून राहिले नव्हते. सगळेजण हाक मारतांना बित्तूबंगा असेच हाक मारायचे. बंगा वाघाच्या हल्यात मारला गेला. त्याला नेलेल्या वाघाला मारणारच अशी शपथ घेतलेल्या बित्तूने सापळ्यात अडकलेल्या त्याच वाघाला मोकळं करून जंगलात जाऊ दिलं. ती वाघीण होती. नुकतीच बछड्यांना जन्म दिलेली, मारलं असतं तर बछडी उघडी पडली असती म्हणून सोडून दिलं. असे हे लोक
नर्मदा नदीवर श्रद्धा असणारी, ती सदेह दर्शन देते असं मानणारी ही आदिवासी जमात नर्मदा परिक्रमा करणाऱ्यांची सेवा करतात. माणूस कसा आहे याचा विचार आम्ही करत नाही तो परिक्रमा करतो आहे एवढेच आमच्यासाठी पुरेसा आहे आम्हाला सेवा करायची आहे ती परिक्रमेची परिक्रमा वासियांची नव्हे ही त्यांची धारणा.
मुलांनी शिक्षण घ्यावं अशी तळमळ असलेला शिक्षक, मुलांच्या जेवणाची काळजी करणारी त्याची बायको.अर्धपोटी आदिवासींना स्वतःच्या तुटपुंज्या पगारातून खायला घालून ही दोघं मुलांना लिहायला वाचायला शिकवू इच्छितात.
एखाद्या प्राण्याच्या अथवा पक्षाच्या जातीचं अस्तित्व धोक्यात येत आहे असं वाटलं तर सारं जग ती जात वाचवायच्या प्रयत्नांना लागतं, तथाकथित बुद्धिजीवी लोक अस्वस्थ होऊन भाषणे देतात, लेख लिहितात. त्या प्राण्याच्या जातीचं अस्तित्व टिकवण्यासाठी भरमसाठ खर्च करायला तयार असतात. परंतु माणसांची एखादी संस्कृती, त्यांची परंपरा, त्यांच्या जीवनाचा पायाच मुळापासून नष्ट होण्याचा धोका उभा राहतो त्याची संपूर्ण समाज व्यवस्थाच मोडून पडणार आहे असं वाटतं तेव्हा त्या परिस्थितीला परिवर्तन म्हणून नाव दिलं जातं.
तो ठरवतो की, आता परत जायचं नाही. इथेच राहायचं, या लोकांमध्ये, यांच्याचसारखं..! जीवन काय आहे..? त्याचा अर्थ काय..? आयुष्याचे सार्थक कशात आहे..? आणि या सर्व प्रश्नांबरोबरच आणखीन एक प्रश्न..आपण कुठून आलो आपल्याला कुठे जायचं आहे..? कोणी फिजिक्सच्या माध्यमातून, तर कोणी धर्मातून, कोणी अध्यात्मातून, हा शोध प्रत्येक जण आपल्या परीने हा शोध घेत असतो.
काहीशी चाकोरीबाह्य वाटणारी कादंबरी भौतिक प्रगतीमुळे माणसांमध्ये हरवलेल्या माणुसकीचा शोध घेत वाचकाला अंतर्मुख करते. भौतिक प्रगतीपासून दुर राहिलेली आदिवासी जमात अजूनही माणसं, प्राणी वा वृक्षवल्ली या सजीवांच्या बाबतीत फार संवेदनशील आहे.