(६ नोव्हेंबर १९०१ - २९ एप्रिल १९८०).
मराठी लेखक, समीक्षक. स्वतंत्र विचारांचे टीकाकार व चिंतक म्हणून क्षीरसागर यांची विशेष ख्याती आहे. समाज, संस्कृती व जीवन यांच्या विविध अंगांबद्दल त्यांनी सखोल चिंतन केले असून वाचकांच्या गृहीत कल्पनांना धक्के देणारे आपले विचारही आव्हानपूर्ण शैलीत व तडफदार रीतीने मांडले आहेत.
१९४० साली प्रसिद्ध झालेल्या राक्षस विवाह या कादंबरीने ते प्रथम प्रसिद्धीस आले. आकर्षक शैली व प्रक्षोभक विचार यांमुळे त्यांची ही कादंबरी बरीच गाजली. १९४५ साली प्रसिद्ध झालेल्या सुवर्णतुला या ग्रंथाने राज- कारणावरही तत्त्ववेत्त्याच्या भूमिके-वरून लिहिणारे विचारवंत म्हणून त्यांचे नाव झाले.
व्यक्ती आणि वाङ्मय (१९३७), वाङ्मयीन मूल्य, वादसंवाद, साहित्याच्या दरबारात, उमरखय्यामची फिर्याद (१९६१), टीकाविवेक(१९६५), आधुनिक राष्ट्रवादी रवींद्रनाथ ठाकूर (१९७०) हे त्यांचेकाही प्रमुख स्फुट टीकालेखसंग्रह. यांमधून सौंदर्यवाद, गूढवाद, नव-मानवतावाद, वास्तववाद इ. वाङ्मयीन वादासंबंधी त्यांनी केलेली मूलभूत चर्चा उद्बोधक व सखोल आहे. क्षीरसागर यांनी त्यांच्या सौंदर्यवादी दृष्टीला जे काही अनिष्ट आढळले, त्यावर त्यांनी प्रामाणिकपणे कठोर टीका केली. ‘खरी भाषाशुद्धी व तिचे खरे वैरी’, ‘कला म्हणजे काय’, ‘साहित्यातील सोवळेपणा’ तसेच ‘नवकाव्य’ आणि ‘नवकथे ‘वरील त्यांचे लेख, त्यांची भाषणे त्यांच्या झुंझार वृत्तीची साक्ष देतात.
( संदर्भ - मराठी विश्वकोश)