लेखक - अलेक्झांन्द्र ड्युमास
अनुवाद - प्रणव सखदेव
सतराव्या शतकात घडणारी थरारक व बेफाम साहसांची "वर्ल्ड क्लासिक" म्हणून प्रसिद्ध असलेली मुळ फ्रेंच भाषेतील जगविख्यात कादंबरी.
दार्तान्यॉ जेमतेम विशीचा युवक. त्याच्या आजारी वयस्कर वडीलांनी त्याला मिस्टर द त्रेव्हील जे त्या वेळचा राजा तेराव्या लुईच्या मर्जीतले होते. अनेक लढाया जिंकून आता ते मस्कटिअर्सचे, म्हणजे राजाच्या सेवेतील खास सैनिकांचे प्रमुख होते. त्यांच्यासाठी पत्र देऊन गुरुस्थानी मानायला लावलं होतं. जेणेकरून दार्तान्यॉचीही भरभराट झाली असती.
शहरात प्रवेश करताच दार्तान्यॉच्या घोड्याची एका गृहस्थाने थट्टा केली म्हणून दार्तान्यॉने त्या गृहस्थावर हल्ला केला परंतु ता गृहस्थाच्या सोबत्यांनी मिळून मारहाण केल्यामुळे दार्तान्यॉ बेशुद्ध पडला. तेव्हा त्या गृहस्थाने त्याच्या खिशातलं ते पत्र काढून घेतलं,
दार्तान्यॉ जेव्हा द त्रेव्हील यांच्या कार्यालयात पोहोचला. त्यांना सगळी परिस्थिती सांगून तो बाहेर येत असतांना त्याला ते गृहस्थ रस्त्याने जातांना दिसताच त्याच्या मागे धावतांना तीन मस्कटिअर्सना धडकतो. त्यांनी दिलेले द्वंदाचे आव्हान दार्तान्यॉ स्विकारतो.
पुढे अशा काही घटना घडतात की हे मस्कटिअर्स दार्तान्यॉचे जीवलग मित्र बनतात.
ज्या गृहस्थाने दार्तान्यॉच्या घोड्याची थट्टा करुन दार्तान्यॉला भडकवलं होतं त्याच्यासोबत एक सुंदर तरुणी होती. त्या दोघांनी मिळून एक मोठं षडयंत्र रचलं होतं. त्यात राजघराण्यातील व्यक्तिंना धोका निर्माण झाला होता. आणि या षडयंत्राला राजाची सेना ज्याच्या अधिपत्याखाली होती त्या कार्डिनलची साथ होती. पर्यायाने देशाची सुरक्षा धोक्यात आली होती. यात फ्रांसची राणी आणि ड्यूक ऑफ बकिंगहॅम या इंग्लडच्या राजाचे पंतप्रधानांन यांचे प्रेमप्रकरण रंगात येत राहते. पुढे इंग्लंड व फ्रेंच दोन्ही देशात युध्दाच्या तयारीला जोर चढतो.
दार्तान्यॉ, त्याचे तीन साथीदार मस्कटिअर्स, राजाचे निष्ठावान असलेले द त्रेव्हील हे सगळे मिळून या सगळ्या संकटांचा सामना करतात. या सगळ्या घडामोडी घडत असतांना जे काही मजेदार प्रसंग उद्भवतात, किंवा दार्तान्यॉ व तीन मस्कटिअर्स जे असामान्य शौर्य दाखवतात त्याची कहाणी म्हणजे ही कादंबरी. या तीन मस्कटिअर्स च्या पण काही आशा आकांक्षा आहेत, त्यांच्याही भुतकाळात काही वेदनादायक घटना घडलेल्या आहेत, या सगळ्याचा मागोवा कथानकात येतो.
जागतिक स्तरावर नावाजलेली मुळ कादंबरी फार मोठी आहे. प्रणव सखदेव यांनी याचे अनुवाद व संक्षिप्तिकरण करतांना कथानकाचा तोल ढळू न देण्याचे आव्हान प्रणव सखदेवांनी सहजपणे पेलले असून मुळ कथानकातील ओघ कुठेही अडखळू दिला नाही.