(२३ एप्रिल, १५६४–२३ एप्रिल, १६१६).
जागतिक कीर्तीचे महान इंग्रज कवी व नाटककार. व्हीनस अँड अडोनिस (१५९३), द रेप ऑफ ल्यूक्रीझ (१५९४) या दीर्घ कथनात्मक कविता व एकशे-चोपन्न सुनीतांची माला (१६०९) ही शेक्सपिअरची काव्यसंपदा.शेक्सपिअरची सुनीत-माला इंग्रजी साहित्याचा बहुमोल अलंकार होय.शेक्सपिअरच्या नाटकांची एकत्र संपादित आवृत्ती (फर्स्ट फोलिओ) जॉन हेमिंग व हेन्री काँडेल यांनी १६२३ मध्ये प्रसिद्ध केली. त्यांतील छत्तीसपैकी अठरा नाटके प्रथमच छापली गेली. ऐतिहासिक नाटकांत शेक्सपिअरने इंग्लंडचा इतिहास उभा करून लँकेस्टर व यॉर्क घराण्यांची भांडणे व त्यांच्यातील यादवी युद्ध यांचे दुष्परिणाम सूचित केले. तसेच राष्ट्रीय ऐक्याचे महत्त्व व आदर्श राजाची प्रतिमा ह्यांचे कलात्मक दर्शन घडविले. त्याच्या ऐतिहासिक नाटकांत इंग्लंडचे बहुतेक ट्यूडर राजे आलेले आहेत. उदा., चौथा, पाचवा, सहावा हेन्री दुसरा, तिसरा रिचर्ड जॉन राजा, तिसरा रिचर्ड, पाचवा हेन्री ही त्यांची काही अमर व्यक्तिचित्रे. त्यांतून शेक्सपिअरचे मानवी मनाचे सखोल व सूक्ष्म ज्ञान व निरीक्षण प्रत्ययास येते.
पश्चिमी प्रबोधनकाळात जाज्ज्वल्य राष्ट्रप्रेमाची भावना नव्यानेच सर्व युरोपीय देशांत निर्माण झाली. शेक्सपिअरने इंग्लंडच्या राष्ट्रप्रेमाचा आपल्या नाटकांतून परिपोष केला. द टू जंटलमेन ऑफ व्हेरोना (१५९४), लव्ह्ज लेबर्स लॉस्ट (१५९४), मिडसमर नाइट्स ड्रीम (१५९६), द मर्चंट ऑफ व्हेनिस (१५९६), मच अडू अबाउट नथिंग (१५९८), ॲज यू लाइक इट (१५९९), ट्वेल्फ्थ नाइट (१५९९) या सुखात्मिकांतून शेक्सपिअरच्या असामान्य प्रतिभेने नाट्यकलेचे सर्व पैलू उजळून काढले.
रिचर्ड द थर्ड व रोमिओ अँड ज्यूलिएट (१५९७) ह्या नाटकांपासून शेक्सपिअरने शोकात्म नाटके लिहिण्यास सुरुवात केली. इ. स. १५९९ ते १६०६ या काळात त्याने जगप्रसिद्ध शोकात्मिका लिहिल्या. उदा., ज्यूलिअस सीझर (१५९९), हॅम्लेट (१६००), ऑथेल्लो (१६०३), किंग लीअर (१६०५), मॅकबेथ (१६०६), अँटनी अँड क्लीओपात्रा (१६०७), टायमन ऑफ अथेन्स (१६०५–०८). यांचा अभ्यास गेली तीनशे वर्षे सतत चालू आहे. यांतील प्रत्येक शोकात्मिका वेगवेगळ्या कारणांसाठी श्रेष्ठ आहे..
जगविख्यात व्यक्तिचित्रे (हॅम्लेट, इआगो, लीअर) सखोल तत्त्वज्ञान (हॅम्लेटची स्वगते, लीअर व त्याच्या विदूषकाची जीवनावरील भाष्ये) दर्जेदार काव्य मानवी जीवनातल्या सर्व रहस्यांचे अमोघ भाषेत अनावरण परिचित कथासामग्रीवरील दिव्य प्रतिभेचे संस्करण ही शेक्सपिअरच्या शोकात्मिकेची वैशिष्ट्ये होत.शेक्सपिअरच्या स्ट्रॅटफर्ड-ऑन-ॲव्हन या जन्मगावी यथोचित स्मारक करण्यात आले आहे.
( संदर्भ- मराठी विश्वकोश)