( २ मे १९१४ - १८ जुलै १९८९ )
डॉ. भट यांचा पीएच.डी.चा प्रबंध भासाच्या नाटकांविषयी आहे. भरतमुनींचे नाट्यशास्त्र, नाट्याचे विविध पैलू, भास, कालिदास, शूद्रकाची अभिजात नाटके हे त्यांच्या चिंतनाचे व लेखनाचे प्रमुख विषय होते. त्यांच्या सुमारे ३० ग्रंथांपैकी निम्म्याहून अधिक याच विषयांसंबंधी आहेत.
संस्कृत नाट्यातील विदूषकावर त्यांनी संशोधनात्मक निबंध लिहिला होता. त्याला मुंबई विद्यापीठाचे व्ही. एन. मंडलिक सुवर्णपदक मिळाले होते. हा निबंध पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाल्यावर १९६०मध्ये त्याला महाराष्ट्र राज्याचा पुरस्कार मिळाला. मुळात इंग्लिशमध्ये असलेल्या या पुस्तकाचे मराठीत व हिंदीत भाषांतर झाले.
संस्कृत नाट्यसृष्टी, कालिदास दर्शन व संस्कृत नाटके आणि नाटककार ही त्यांची मराठी पुस्तके त्यांच्या रसिकतेची साक्ष देतात. संस्कृत काव्यशास्त्राची प्रस्तावना हे त्यांचे अत्यंत सुगम व उद्बोधक असे पुस्तक आहे.
(संदर्भ - महाराष्ट्र नायक, डॉ वीणा लोंढे)