(८ जून १९१०-२ मे१९७३).
श्रेष्ठ मराठी समीक्षक व विचारवंत. बेडेकरांनी १९३६ च्या आसपाच कथा, तसेच राजकीय वाङ्मयीन स्वरूपाचे लेखन करावयास सुरुवात केली होती. तथापि त्यांचे सर्व महत्त्वाचे लेखन १९५० नंतरच्या कालंखडातच झाले. नवकाव्य, नवकथा, नवे साहित्यविचार, सौंदर्यशास्त्रीय मीमांसा, अस्तित्ववादासारख्या विचारप्रणाली ह्यांचा हा काळ होता आणि ह्या काळाची आव्हाने व आवाहने साक्षेपाने स्वीकारुन बेडेकर समीक्षेच्या क्षेत्रात उतरले.
साहित्य : निर्मिती व समीक्षा (१९५४), साहित्यविचार (१९६४), केशवसुतांची काव्यदृष्टी (१९६६), आधुनिक मराठी काव्य : उदय, विकास आणि भवितव्य (१९६९) ह्यांसारख्या ग्रंथांतून मोजकाच परंतु मौलिक साहित्यविचार त्यांनी माडंला.
समाजचिंतन (१९६९), विचारयात्रा ह्यांसारख्या ग्रंथातून त्यांच्या सामाजिक विचाराची ओळख होते. साहित्य : निर्मिती व समीक्षा ह्या ग्रंथात साहित्यसमीक्षेचे स्वरुप नेमकेपणाने विशद करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. भारतीय प्रबोधन: समीक्षण व चिकित्सा (१९७३) ह्या नावाने निघालेल्या शंकरराव देव गौरवग्रंथाचे संपादन त्यांनी भा.श.भणगे ह्यांच्या समवेत केले होते. मात्र हा ग्रंथ त्यांच्या मरणोत्तर प्रसिद्ध झालेला आहे.समाजवाद प्रेरणा व प्रक्रिया हा बेडेकरांच्या गौरवार्थ काढण्यात आलेला ग्रंथ १९७१ मध्ये प्रसिद्ध झाला. बेडेकरांच्या सर्व लेखनाची सूची त्यात अंतर्भूत आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील एक आघाडीचे तत्त्वचिंतक समीक्षक ह्या नात्याने त्यांनी मांडलेल्या प्रमेयांना कायमची विचारार्हता लाभलेली आहे.
( संदर्भ - मराठी विश्वकोश)