उत्तम पुरुष एकवचन

पुस्तकाचे नाव - उत्तम पुरुष एकवचन
लेखक - रंगनाथ तिवारी





निजामी राजवटीच्या अखेरच्या काळात मराठवाड्यातील एका लहानशा खेड्यातील गढीवर राहणाऱ्या जहागीरदार बाबामहाराजांच्या कुटुंबाची ही कथा. 

बाबा महाराजांच्या बहिणीचा मुलगा उत्तम सुट्यात गढीवरच यायचा. त्याच्या शिक्षणाची जबाबदारी बाबामहाराजांनी घेतली होती. ताई, बाबामहाराजांची मुलगी मावशीच्या देखरेखीखाली लहानची मोठी झाली होती. ताई अगदी लहान असतांना तिची आई गेली. तिचा सांभाळ करण्यासाठी मावशी आल्या त्या  परत गेल्याच नाही. त्यांचे पती आणि मुलगी उमा हे तिथेच राहू लागले. रात्री अपरात्री बाबा महाराजांच्या महालातून मावशीचा चढलेला आवाज ऐकू येई. दिवसा सुद्धा सर्वांच्या देखत त्या बाबा महाराजांना टाकून बोलत. दुसऱ्यांसमोर वाघासारखे असणारे बाबा महाराज मावशीच्या शिव्या ऐकून फक्त हसत. एकूणच मामला लक्षात न येण्यासारखा होता. 

ताई उत्तमहून फक्त एक वर्षाने मोठी. जमीनदारांची मुलगी म्हणून जे काही शिक्षण व्हायचं ते गढीच्या आतच झालं. थोडाफार इंग्रजी आणि खूप सारं मराठी आणि उर्दू. उत्तम अधून मधून सुट्टीला वडगावला येईल उन्हाळ्यात आंब्याचा आकर्षण तर असायचं पण ताईची ओढ वेगळीच होती. या दोघांचं हसणं खेळणं पाहून लोक नाकं मुरडीत. ताईला परवाना हवा होता तिच्यावर जीव टाकणारा आणि घडीच्या बंदिस्त वातावरणात उत्तम पेक्षा अधिक उत्तम पात्र मिळणं कठीण होतं. दोघांच्याही मनात तारुण्यसुलभ भावना जागृत होत होत्या. 

सुट्या संपल्यावर उत्तम गेला आणि काही दिवसातच त्याला ताईच्या लग्नाची पत्रिका मिळाली. 

ताई नसतांना गढीवर जाण्याची उत्तमची ईच्छा नव्हती. पण मग दुसरीकडे जाणार कुठे? उत्तम आला तेव्हा बाबामहाराज खूप आजारी होते. लग्न झाल्यावर सासरी गेलेली ताई आलीच नव्हती. म्हणून उत्तमने ताईला आणायला जायचं ठरलं. तिथे गेल्यावर ताईची अवस्था बघून तो चरकला. तिची पाठराखीन म्हणून आलेल्या हौसाने ताईच्या नवऱ्याला फितवलं होत. 

तिथे ताईला मारहाण होतांना बघून उत्तमने खवळून तिच्या नवऱ्यावर हात उगारला. आणि संकटाला आमंत्रण दिलं ताई आणि उत्तम दोघांना मारहाण झाली, बांधून ठेवलं. तिथून हौसाने सुटका केल्यावर कसेबसे गढीवर पोहोचले. ताई परत सासरी जाणार नव्हती पण काही दिवसांनी तिचा नवरा सोबत्यांसह बंदूक घेऊन आला. नाईलाजाने ताई गेली. 

स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले. निजामाच्या आधाराने रझाकार थैमान घालू लागले. रसुलमिया सोबत होते तोपर्यंत बाबामहाराजांना काळजी नव्हती, पण रसुलमियाचा मुलगा रझाकारांना सामील झाल्यावर रसुलमियाने त्याला दिलेला मार बघून गढीकडे बघायची कोणी हिम्मत करीत नव्हतं. 

आणि एक दिवस उत्तमला बातमी मिळाली की, रझाकारांनी ताईला पळवून नेलं. दुसरा कोणताही विचार न करता तो ताईला शोधायला निघाला. 

हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या अखेरच्या वर्षात मराठवाड्यातील खेड्यापाड्यातून नेमके काय व कसे घडत होते, सरंजामदार, सामान्य प्रजा, रझाकार आणि मुक्तीसैनिक यांच्या परस्परांचे संबंध आणि गढ्यात  राहणाऱ्या जाहीरदारांचे प्रछन्न जगणे याचा घेतलेला वेध अंतर्मुख करतो. रझाकारांचा धुडगूस, अत्याचार आणि निजामाने शरणागती पत्करल्यावर रझाकारांचा घेतलेला बदला माणसातलं क्रौर्य दर्शवते, 




 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.