(३० मार्च १९४१ – ९ एप्रिल २००९).
महाराष्ट्रातील लोककला संशोधक, गीतकार, नाटककार. फ्रान्स,आयलंड,जपान आदी देशांत महाराष्ट्रातील लोककलांची पथके नेवून तेथे मार्गदर्शन अशोकजींनी केले.
खंडोबाचे जागरण,देवीचा गोंधळ, कोकणातील दशावतार, ठाणे जिल्ह्यातील आदिवासींच्या कला,पारंपरिक तमाशा, कीर्तन, लळीत अशा लोककलांच्या जतन, संवर्धन आणि संशोधनासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्यांनी आय. एन.टी.च्या लोक प्रायोज्य कलेच्या संशोधन विभागाचे संचालक असताना कार्य केले. आय. एन. टी तर्फे ग्रामीण भागातील लोककला आणि लोककलावंतांना नागरी रंगमंच उपलब्ध करून देण्याचे काम त्यांनी केले.
अशोक परांजपे यांचे मराठी रंगभूमीवरील योगदान नाटककार म्हणून उल्लेखनीय आहे. संत कान्होपात्रा, संत गोरा कुंभार,अबक दुबक, बुद्ध इथे हरला आहे, आतून कीर्तन वरून तमाशा, दार उघड बया सारखी संगीत रंगभूमीचे वैभव वाढविणारी नाटके त्यांनी लिहिली.
त्यांनी स्तंभ लेखनही केले. ‘अनोळखी पाऊले’ ही त्यांची स्तंभलेखन मालिका अतिशय प्रसिद्ध होती. लोककलांचे संशोधन, नाट्यलेखन या सोबतच ते गीतकार म्हणूनही लोकप्रिय होते. अवघे गर्जे पंढरपूर, आला आला सुगंध मातीचा, एकदाच यावे सखया,कुणी निंदावे वा वंदावे,केतकीच्या बनी तिथे, नाम आहे आदी अंती नाविका रे, पाखरा जा दूर देशी ,वाट इथे स्वप्नातील संपली जणू ,आला सुगंध मातीचा अशी अनेक लोकप्रिय गीते लिहिली.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते. लोककला संशोधनाच्या क्षेत्रातले कार्य उल्लेखनीय होते.
( संदर्भ - मराठी विश्वकोश)