लेखिका - शुभांगी भडभडे
इतिहासातील अनेक व्यक्तिरेखा अनेकदा दुर्लक्षित, उपेक्षित राहतात. काळाच्या ओघात इतिहासाच्या पानावर केवळ नावाने शिल्लक असतात. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख कधीतरी कुठेतरी शिलालेखाच्या पाच-सात ओळीतून वाचला जातो आणि मग कुठे इतिहास लेखकांना जाग येऊन त्यांच्या कार्यकाळाचा अभ्यास केला जातो.
सातवाहन कुळातील सातकणी राजाची पत्नी नागनिका. इ. स पूर्व २०० या कालखंडात तिने राज्यकारभार केला. राजा सातकणी मृत्यू पावला तेव्हा मुलं लहान होती. दहा वर्षांच्या मुलाला गादीवर बसवून नागनिकाने राज्यकारभार हाती घेतला. शक, हुण, यवन यांनी भारतावर आक्रमण करता करता स्थायिक झालेल्या शककुळातील ही कन्या शकनिका नागनिका म्हणून तिने वैदिक ब्राह्मण असलेल्या आणि शास्त्रवृत्तीच्या सातवाहन कुळात विवाह केला आणि सनातन हिंदू धर्म, यज्ञ संस्कृती संवर्धन करीत सर्व धर्म समभाव ठेवला. ती प्रजाहितदक्ष तर होतीच, शिवाय अंतर्गत व बाह्य सुरक्षा बद्दल अत्यंत जागृत होती. तिच्या कालखंडात राज्याचा विस्तार होतच होता. अर्थव्यवस्था सुध्दा प्रगतीपथावर होती. तिने केलेले सामाजिक सुधार आणि कार्य व्यवस्था आजही महत्त्वपूर्ण मानली जाते.
सातकर्णी राजाचा अकाली मृत्यू झाल्यावर काही काळ राज्यात अनागोंदी पसरण्याची शक्यता होती. राज्याच्या सीमेवर कुरबुरी वाढत होत्या. पण दहा वर्षांच्या राजपुत्राला राज्यभिषेक करून ज्या कणखरपणाने ती परिस्थिती हाताळली ती कौतुकास्पद होती. प्रजेतील चुकलेल्या लोकांना मोठ्या मनाने माफ करणाऱ्या नागनिकाने देषद्रोह्यांना मृत्यूदंड देतांना मुळीच दयामाया दाखवली नाही.
वास्तविक विश्वातली पहिली स्त्री राज्यकर्ती म्हणून आज तरी नागनिकाचा उल्लेख होतो आहे. तरीही इ. स. पुर्व ६९ मध्ये झालेल्या क्लिओपात्राचा जगभर बोलबाला झाला. आणि नागनिकाला मात्र तशी प्रसिद्धी मिळाली नाही.
ही ललित कादंबरी असल्यामुळे लेखिकेने काही ठिकाणी कल्पना स्वातंत्र्य घेतलेही असेल, परंतु त्यामुळे कथानक अधिक वेगवान व वाचनीय होते.
राणी नागनिकाच्या जीवनप्रणालीची साक्ष देणारा, आजवरच्या इतिहासात अनन्य महत्त्व असलेला हा शिलालेख आहे.
"महाराणी नागनिका सिरी सातकर्णी यांची भार्या, अंगियकूलवर्धन त्रणकायिर महारठी यांची कन्या आहे आणि वेदिश्री, शक्तिश्री पुत्रांची माता आहे. ती स्वतः ‘नागबरदायिनी’, ‘मासोपवासिनी’, ‘गृहतापसी’ ‘चरितब्रह्मचर्या’ अशी विशेषणं लावावीत अशी श्रेष्ठ स्त्री आहे. ‘दक्षिणपथपती, सिरी सातकर्णी हे सम्राट असून ‘समुद्रवल्यांकित पृथ्वीचा प्रथम वीर’ असे अनन्य वीर आहेत. त्यांचा हा प्रस्तर लेख."