(१० एप्रिल १९०७ - १ फेब्रुवारी १९९५)
मराठी नाटककार आणि पत्रकार. मराठीतील अग्रगण्य वाङ्मयीन नियतकालिक म्हणून पुढे ख्याती पावलेल्या सत्यकथा या मासिकांचे ते संपादक होते. आयुष्यात खरोखरी घडलेल्या घटनांवरील गोष्टी, की ज्या सहसा मासिकांतून
प्रसिद्ध करण्यास इतर संपादक धजणार नाहीत, अशा सत्य कथा आरंभी सत्यकथेत प्रसिद्ध केल्या जात. आशा, चित्रा, तुतारी, वसुंधरा ह्यांसारख्या साप्ताहिकांचेही ते संपादक होते. खुसखुशीत, विनोदी आणि कल्पकतेची साक्ष देणारे सदरे हे या साप्ताहिकांचे वैशिष्ट्य असल्यामुळे ती लोकप्रिय झाली होती.
त्यांनी कादंबरीलेखनही केले. सीमोल्लंघन आणि मृगजल ह्या त्यांनी लिहिलेल्या दोन सामाजिक कादंबऱ्या. तथापि त्यांचे विशेष उल्लेखनीय कार्य रंगभूमीच्या क्षेत्रातले आहे.आशीर्वाद हे त्यांनी लिहिलेले पहिले नाटक. त्यानंतर कुलवधु , कन्यादान , अलंकार, माझे घर , वहिनी , एक होता म्हातारा, कोणे एके काळी , रंभा, भटाला दिली ओसरी इ. नाटके त्यांनी लिहिली. त्यांपैकी कुलवधु ह्या नाटकाला फार मोठी लोकप्रियता प्राप्त झाली. नाट्यलेखनाबद्दल रांगणेकर यांना दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचे पारितोषिक (१९८२) आणि राम गणेश गडकरी पारितोषिक (१९८७) मिळाले.
आपल्या नाटकांचे दिग्दर्शन रांगणेकर स्वतः करीत असत. नाट्यनिकेतन ही संस्था स्थापन केली .त्यांनी काही एकांकिकाही लिहिल्या आहेत.
१९६७ साली गोवा येथे भरलेल्या मराठी नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते.
( संदर्भ - मराठी विश्वकोश)