(११ एप्रिल १८२७ - २८ नोव्हेंबर १८९०).
महाराष्ट्रातील समाजसुधारकांच्या पहिल्या पिढीतील श्रेष्ठ समाजसुधारक आणि विशेषतः समाजातील श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची व सामाजिक दास्याची मीमांसा करणारा क्रांतिकारक विचारवंत.
जोतीरावांना इंग्रजी शिक्षणाचा वेध लागला होता. त्यात अनेक अडचणी आल्या, तरी शालान्त परीक्षेइतके इंग्रजी शिक्षण त्यांनी पुरे केले. इंग्रजीतील उच्च दर्जाचे ग्रंथ समजण्याची पात्रता तसेच इंग्रजीत लेखन करण्याची क्षमताही त्यांनी प्राप्त करून घेतली. विवाहानंतर पत्नी सावित्रीबाईचे शिक्षण जोतीरावांनीच पुरे केले. त्या स्वयंस्फूर्तीने जोतीरावांच्या समाजसुधारणेच्या आणि लोकशिक्षणाच्या कार्यात जन्मभर सहभागी झाल्या.
जगाचा, पश्चिमी देशांचा व विशेषतः भारताचा प्राचीन, अर्वाचीन इतिहास त्यांनी इंग्रजीमधून वाचला आणि सखोलपणे त्यावर मनन केले. संस्कृत ग्रंथही त्यांनी वाचले. वेद, स्मृती, पुराणे यांच्यातील कथांचा अभ्यास केला. ब्राह्मण समाजासह सर्वच समाज स्त्री शिक्षणाच्या विरोधी असतांना त्यांनी १८४८ ला मुलींसाठी शाळा स्थापन केली. त्यांच्या पत्नी सावित्रीबाई यांनी याच शाळेत अध्यापनाचे कार्य सुरू केले. अवहेलना व प्रतिकूल परिस्थितीला धैर्याने तोंड देऊन जोतीराव व सावित्रीबाई यांची समाजसुधारणेच्या क्षेत्रात आगेकूच सुरूच राहिली.
नंतर रास्ता पेठेत व वेताळ पेठेत आणखी दोन शाळा काढल्या (१८५१). अस्पृश्यांसाठी शाळा काढली. या त्यांच्या प्रयत्नांना तत्कालीन मोठमोठ्या विचारवंत समाजसुधारकांचा आणि राज्यकर्त्यांचाही पाठिंबा मिळत राहिला. बाल व तरुण विधवांचा प्रश्न सोडविण्याकरिता पुनर्विवाहाची चळवळ सुधारकांनी सुरू केली. या चळवळीला जोतीरावांचा पूर्ण सक्रिय पाठिंबा होता.अस्पृश्य व दलितांच्या प्रश्नालाही त्यांनी तितक्याच मनस्वीपणेचालना दिली.
बहुजन समाजावर ब्राह्मणांनी लादलेली ही मानसिक गुलामगिरी स्पष्ट करण्याकरिता ब्राह्मणांचे कसब (१८६९), गुलामगिरी (१८७३), सत्सार (अंक १ व २, १८८५) इ. निबंध लिहिले. श्रमिक बहुजन समाजाच्या आर्थिक अवनतीचे उत्कृष्ट चित्र शेतकऱ्याचा आसूड या विस्तृत निबंधामध्ये फुले यांनी रेखाटले आहे. सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक या निंबधात (मृत्यूनंतर प्रसिद्ध, १८९१) फुले यांनी आपल्या समग्र विचारांचे सार असलेल्या विश्वकुटुंबवादाची सुसंगत मांडणी केली आहे.फुले यांनी अखंडादि काव्यरचना (१८६९) केली आहे आणि काही काव्यरचना सार्वजनिक सत्यधर्म पुस्तकामध्येही अखेरीस घातली. जोतीरावांचे इतर वाङ्मय पुढीलप्रमाणे आहे : छत्रपति शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा (१८६९), हंटर-शिक्षण आयोगापुढे सादर केलेले निवेदन (मूळ इंग्रजी-१८८२), इशारा (१८८५). ( संदर्भ - मराठी विश्वकोश)