माधव गडकरी

माधव गडकरी 



( २५ सप्टेंबर १९२८ - १ जुन २००६ )

 'संपादक हा चेहेऱ्याने नव्हे तर लेखणीने ओळखला गेला पाहिजे', ही पारंपारिक विचारसरणी झुगारून देऊन संपादक त्याच्या लेखणीने तर ओळखला गेलाच पाहिजे , शिवाय या लेखणीमागील हाताने आणि तो हात ज्या चेहेऱ्याचा आहे त्या चेहेऱ्याने ओळखला गेला पाहिजे, अशी नवी विचारसरणी आत्मसात करून आणि आयुष्यभर तिच्याशी पूर्ण इमान राखून ज्या गडकरींनी पत्रकारितेचा धर्म पाळला ते गडकरी केवळ एक पत्रकार , संपादक, लेखक वा सामाजिक कार्यकर्तेच नव्हे तर ज्याला इंग्रजीत 'गडकरी स्कूल ऑफ जर्नालिझम म्हणता येईल त्या पाठशाळेचे कुलपतीही होते. 



महाराष्ट्र टाइम्स मध्ये गडकरी 'असा हा महाराष्ट्र ' हे साप्ताहिक सदर लिहीत असत , या लेखांच्या माध्यमातून " महाराष्ट्राचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक दर्शन " त्यांनी स्वतः ही  नव्याने घेतले आणि वाचकांनाही घडविले . त्यातील निवडक लेखाचे 'असा हा महाराष्ट्र ' हे द्विखंडात्मक पुस्तक प्रसिद्ध झाले.  भारतात आणीबाणी पुकारली गेल्याचे वृत्त गडकरींना टोकियो येथे समजले.  तेथून परतल्यावर त्यांची सत्वपरीक्षा सुरु झाली.  वृत्तपत्रांवर सेन्सॉरशिप लादली गेली होती.  परंतु "एक दिवसही आमच्या अंकाची पाने सेन्सॉरकडे छपाई पूर्वी तपासणीसाठी दिली नाहीत", असे त्यांनी सांगितले आहे.  थेट दिल्लीहून त्यांना धमक्या येत परंतु तरीही ते निर्भयपणे सडेतोड अग्रलेख लिहीत राहिले. 




गडकरी आणि तेव्हाचे गोव्याचे मुख्यमंत्री श्री.दयानंद बांदोडकर यांच्यात कित्येक विषयांवर गंभीर मतभेद झाले,  त्यावरून वाद झाले.  त्यावर माधवरावांनी 'सत्ता आणि लेखणी' हे छोटे पुस्तकही प्रसिद्ध केले. गडकरी 'लोकसत्ता' चे संपादक म्हणून रुजू झाल्यावर त्यांच्या पत्रकारितेतील कार्यावर कळस चढविला. ह्याही काळात त्यांनी अनेक महत्त्वाचे विषय हाताळले, त्यांना तोंड फोडले, सार्वजनिक हितासाठी वाद ओढवून घेतले, त्यातून त्यांच्यावर उच्च न्यायालयाच्या बेअदबीचे दोन खटले झाले, ते त्यांनी जिद्दीने लढविले, हा सर्व वृत्तांत त्यांनी आपल्या पुस्तकात तपशिलाने कथन केला आहे.त्यांच्या ३५ पुस्तकांपैकी चार पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे लेखन पुरस्कार मिळाले आहेत. १९९० साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

( संदर्भ - माधव गडकरी संकेतस्थळ)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.