श्री. कृ. कोल्हटकर

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर 



( २९ जुन १८७१ - १ जुन १९३४ )कोल्हटकरांचे नाव घेतले जाते ते मुख्यत: नाटककार, विनोदकार आणि ठ म्हणून. त्यांची नाटके जरी त्यांच्या हयातीतच रंगभूमीवर नाहीशी झाली, तरी त्यांचा मराठी नाट्यलेखनावर झालेला परिणाम दुर्लक्षणीय नाही. त्यांच्या पदरचनेने ज्याप्रमाणे रंगभूमीवरील संगीताला वेगळे आकर्षक वळण लावले, त्याचप्रमाणे त्यांच्या संवादलेखनाने मराठी नाटकांतील संवादांमध्ये खटकेबाजपणा आणि कोटित्व आणले.  

त्यांचे सुदाम्याचे पोहे… हे पुस्तक हा मराठीचा बहुमोल वाङ्‍मय ठेवा आहे. असामान्य कल्पनाविलास व कोटित्व यांच्याबरोबच समाजचिंतनातून जन्माला आलेल्या सामाजिक सुधारणांविषयीच्या पुरोगामी भूमिकेतून स्फुरलेले असल्यामुळे ते जितके रंजक तितकेच विचारप्रवर्तक ठरले. सुदाम्याचे पोहे… मध्ये संगृहीत झालेल्या लेखांची संख्या बत्तीसच असली, तरी त्यांतून प्रकट होणाऱ्या उपहासविषयांची व्याप्ती फार मोठी आहे. त्यांच्या असाधारण कल्पकतेला व्यासंगाची, शास्त्रीय दृष्टीची, शिस्तप्रियतेची व परिश्रमशीलतेची सतत जोड मिळाल्यामुळे त्यांचे लेखन अत्यंत भारदस्त व प्रभावी ठरले आणि म्हणूनच विसाव्या शतकाच्या पहिल्या तीन दशकांत कोल्हटकर ही केवळ एक व्यक्ती न राहता ती संस्था बनली.



त्यांनी केलेल्या साहित्यसेवेबद्दल त्यांना १९२२ साली पुण्यास भरलेल्या द्वितीय कविसंमेलनाचे अध्यक्षपद व १९२७ साली पुण्यासच भरलेल्या महाराष्ट्र साहित्यसंमेलनाच्या बाराव्या अधिवेशनाचे अध्यक्षपद देण्यात आले. सांगली येथे भरलेल्या तृतीय ज्योतिष संमेलनाचेही (१९२०) ते अध्यक्ष होते. 


(संदर्भ - मराठी विश्वकोश)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.