(२२ मे १८७१ – २० डिसेंबर १९३३).
महाराष्ट्रातील एक शांकरमतानुयायी अद्वैती.संस्कृतातील बरेचसे प्राचीन तत्त्वज्ञानसाहित्य बापटांनी मराठीत आणले, ही त्यांची फार मोठी कामगिरी होय. गीता, उपनिषदे आणि ब्रह्मसूत्र ह्या प्रस्थानत्रयीचा शांकरभाष्यानुसार परिचय त्यांनी मराठीतून घडविला. तसेच भारतीय तत्त्वज्ञानातील अद्वैतादी विविध दर्शनांवर मराठीतून लेखन केले. रामानुज, पूर्णप्रज्ञ, माहेश्वर, जैमिनी-पाणीनी ह्या दर्शनांवर त्यांनी समतभेद लिहिले तर जैन, बौद्ध, चार्वाक ह्या दर्शनांचा परिचय घडविताना त्यांचे खंडनही केले.
ब्रह्मसूत्रशारीरभाष्यार्थही त्यांनी तीन भागांत सांगितला. मूळ सूत्र, सूत्रार्थ, शांकरभाष्य, अवतरणे, स्पष्टीकरण आणि भामत्यादी टीकाकारांचा अधिक आशय व्यक्त करणाऱ्या टीपा ह्यांसह हा भाष्यार्थ त्यांनी दिला आहे. शंकराचार्यकृत आत्मबोध आणि अपरोक्षानुभूती ह्या ग्रंथांचे त्यांनी केलेले अनुवादही (१९॰२ १९॰३) उल्लेखनीय आहेत. त्यांनी मराठीत अनुवादिलेल्या ग्रंथात सोमदेवाच्या कथासरित्सागराचाही समावेश होतो (भाग १ ते ४ १९११-१९१२). धर्मराजा ध्वरींद्रकृत वेदान्तपरिभाषा ह्या ग्रंथाच्या विवरणाचे तसेच वेदान्त शब्दकोशाचे कामही त्यांनी हाती घेतले होते. तथापि ते त्यांच्याकडून अपूर्ण राहिले. ह्या दोन्ही कामांचा उर्वरित भाग रंगनाथ दत्तात्रेय वाडेकर ह्यांनी पूर्ण केला आणि वेदान्तपरिभाषा व वेदान्तशब्दकोश हा ग्रंथ प्रसिद्ध झाला (१९३३). बापटांनी १९२५ मध्ये ‘आचार्यकुल’ ह्या नावाची एक अध्यापनसंस्थाही स्थापिली होती. हंपी मठाधिपतींकडून ‘आचार्यभक्त’ आणि बनारस येथील श्रीभारतधर्ममहामंडळातर्फे ‘शास्त्रसुधाकर’ अशा सन्मानाच्या पदव्या त्यांना मिळाल्या होत्या.
( संदर्भ - मराठी विश्वकोश)