पुस्तकाचे नाव - ॲनिमल फॉर्म
लेखक - जॉर्ज ऑरवेल .
अनुवाद - भारती पांडे.
निरंकुश राज्यसत्तेचे धोके उघड करण्याच्या हेतूने लोकांना सावध करणारी ही राजकीय कादंबरी.
ॲनिमल फार्म प्रकाशित होऊन ७५ वर्षं लोटल्यानंतरही ती तेवढीच कालसुसंगत आणि लक्षवेधक वाटते. दोन जागतिक महायुद्धं आणि निरंकुश राजसत्तांचा मोठ्या प्रमाणावर उदय होताना बघितल्यानंतर ऑर्वेल यांनी जगातला निरंकुश सत्तावाद आणि फॅसिझम यांबाबतच्या धोक्यांविषयी लिहिण्याची जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेतली. सामान्य माणसांना या गोष्टींच्या भयानक परिणामांची पूर्वसूचना मिळावी, हा त्यामागचा हेतू होता.
ही रुपमात्मक कादंबरी रशियातील तत्कालीन बोल्शेव्हिक क्रांतीची भ्रामक बाजू उघडतकीस आणण्यासाठी लिहिली होती. परंतु आज जगातील कोणत्याही देशाच्या राजकीय परिस्थितीशी असलेलं कादंबरीतील घटनांचे साम्य ठळकपणे जाणवतं.
ही नुसती कादंबरी नसून तत्कालीन सोवियत रशियाच्या वरकरणी साम्यवादी वाटणाऱ्या व्यवस्थेवर केलेला हल्ला होता.
ॲनिमल फॉर्म मधील नेपोलियन प्रमाणेच प्रत्येक राजव्यवस्थेमध्ये सत्तेवर येणारे नवीन सत्ताधारी त्यांना विरोध करणारे कसे राजद्रोही असुन अगोदरचे सत्ताधारी कसे चुकीचे आहेत हे नागरिकांना पटवून देतात. विरोध वाढू नये म्हणून त्यांचे प्रचारक सतत जनतेमध्ये आपल्या कामाचा खोटा आढावा देत राहतील आणि जनतेच्या अल्प स्मृतीचाचा फायदा घेऊन आत्ताची परिस्थिती ही आधीच्या परिस्थितीपेक्षा उत्तम आहे हे ठसवत राहतील याची खबरदारी घेतात.
हळूहळू ज्या मूल्यांचा आधार घेऊन आणि ज्या राज्यव्यवस्थेचा आधार घेऊन ते सत्तेवर आले ती मुल्ये आणि ती राज्यव्यवस्था बदलण्याचा प्रयत्न करू लागतात. बघता बघता आधीचे सत्ताधारी व नंतरचे सत्ताधारी यांच्या फरक शिल्लक राहत नाही. दोन पायावर चालणाऱ्या डुकरात आणि माणसात फरक करू न शकणाऱ्या सामान्य लोकांकडे हे सर्व निमूटपणे पाहण्याशिवाय दुसरा काही पर्याय उरत नाही.
सर्व प्राणी समान आहेत; पण काही प्राणी अन्य प्राण्यांपेक्षाही समान आहेत. हे म्हणजे सत्तावर्तुळा बाहेरील लोक किंवा विरोध करणाऱ्यांसाठी हा एक संदेश आहे की, जास्त समान लोकांना सत्ताधारी लोकांचे संरक्षण आहे. आणि जे समान आहेत त्यांना काडीचीही किंमत नाही.
जॉर्ज ऑरवेलनी ही कादंबरी १९४५ साली लिहिली होती. पाऊणशे वर्षा नंतरही या परिस्थितीत काही फरक पडला आहे असे वाटत नाही. जोपर्यंत जगातील राज्यव्यवस्थांमध्ये शक्ती व न्याय यांच्यामध्ये समतोल राखला जाणार नाही, जोपर्यंत सत्ताधारी आपल्या सत्तेचा अन्याय्य वापर करीत राहतील तोपर्यंत सामान्य माणसाला नीमुटपणे बघत राहण्याखेरीज गत्यंतर राहणार नाही. पाऊनशे वर्षापुर्वीची कादंबरी आजही प्रासंगिक वाटते. भविष्यातही वाटत राहील. काही साहित्य कालातीत असते त्यापैकी एक कादंबरी एक आहे.