(३१ मे १९३८ – ९ मार्च २०१७).
महाराष्ट्रातील प्रसिद्ध नाट्यसमीक्षक. नाट्यक्षेत्रात ते ‘विभा’ म्हणून ओळखले जात असत. विभा यांनी नाट्यविषयक विपुल ग्रंथसंपदेची निर्मिती केली. वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रेरणेने विभा यांनी १२०० पानी मराठी नाट्यकोश (२०००) हा नाट्यसृष्टीची साद्यंत माहिती देणारा मराठीतील पहिला नाट्यकोश संपादित केला आहे.
यामध्ये भारतातील विविध रंगभूमींच्या संक्षिप्त परिचयासोबत मराठी रंगभूमीच्या सुरुवातीपासूनचा कालखंड शब्दबद्ध करताना जुनी नाटके, मराठी व अमराठी नाटककार, कलाकार, निवडक संगीत नाटके, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, समीक्षक, पडद्यामागील मदतनीस, प्रेक्षक, नाट्यसंस्था, नाट्यगृह, नाट्यनिर्माते, नाट्यग्रंथ, नियतकालिके, संमेलनाध्यक्ष इत्यादींविषयी माहिती दिलेली आहे. या कोशाचा हिंदी अनुवादही मराठी नाट्यकोश खंड १ व २ या नावाने प्रकाशित झालेला आहे.
मराठी नाट्यसमीक्षा करताना नाटक, साहित्य आणि संगीत या क्षेत्रातल्या मराठी सृष्टीतील दिग्गज साहित्यिक, कलाकारांशी विभांची भेट झाली व मैत्री जमली. त्यांपैकी निवडक वीस कलाकारांची व्यक्तिचित्रे विभांनी नाटकातली माणसं या त्यांच्या पन्नासाव्या पुस्तकातून साकारली आहेत.साहित्यिक-कलाकारांची नाटके, प्रयोग आणि त्या त्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये कथन करीत रंगभूमीच्या इतिहासातील अनेक प्रसंग व घटना त्यांनी उलगडल्या आहेत.हे महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे या संस्थेचे २००६ ते २०११ या काळात प्रमुख कार्यवाह होते. साहित्य परिषदेच्या मराठी वाङ्मयाचा इतिहास खंड ७ चे कार्यकारी संपादक म्हणून त्यांनी काम पाहिले. आकाशवाणी आणि दूरदर्शनवरील अनेक नाट्यविषयक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांनी नभोनाट्यलेखनही केले होते. जाणार कुठे, गुलाबी हत्ती, अंमलदार या नाटकांतून अभिनय केला. तर तुझे आहे तुजपाशी, ससा आणि कासव या नाटकांचे दिग्दर्शन केले होते. विभा यांना अनेक पुरस्कार मिळाले. त्यामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कृष्ट संपादनाचा पुरस्कार, नाट्यगौरव पुरस्कार, नाट्यदर्पण पुरस्कार, वि. स. खांडेकर नाट्यसमीक्षक पुरस्कार (१९८३) इत्यादींचा समावेश आहे.
( संदर्भ - मराठी विश्वकोश)