( ३१ मे १९१० - २७ ऑक्टोबर २००१ )
सुरुवातीच्या काळात ते विनोदी कथालेखन करत असत. माझा विक्रम, वैतागवनातील वाफारे हे त्यांचे सुरुवातीच्या काळातले काही विनोदी कथासंग्रह. मराठीतील उत्कृष्ट विनोदी कथासंग्रहात श्री. राम कोलारकरांनी त्यांच्या जवळपास वीस कथा अंतर्भूत केलेल्या आहेत. स्वतंत्र विनोदी कथा, भाषांतरित व रूपांतरित विनोदी कथा, लोकप्रिय रहस्यकथा व प्रेमकथांची विडंबने अशा सर्व प्रकारचे लेखन त्यांत आहे.
बाल-कुमारांसाठीच्या बालमित्र या पाक्षिकाचे भागवत संस्थापक होते. हा अंक त्यांनी जवळजवळ सात वर्षे काढला. त्यातले बहुतेकसे लेखन भागवत एकटाकी करत. त्यासाठी ते विविध टोपणनावे वापरत असत. कुमार वाचकांंचे भाव विश्व समृद्ध करण्यात त्यांच्या इतकी भरीव कामगिरी क्वचितच कोणी केली असेल. जागतिक कीर्तीच्या लेखकांच्या साहसकथांचे कथांचे मराठी अनुवाद, त्याचबरोबर पूर्णपणे स्वतंत्र अशा भुताळी जहाज, खजिन्याचा शोध यासारख्या कादंबऱ्यांनी कुमारवर्गाचे मनोरंजन केले.
त्यांनी लहान मुलांसाठी अनेक कादंब-या, विज्ञानकथा लिहिल्या. बनेश फेणे ऊर्फ फास्टर फेणे हा भा.रा.भागवत यांनी लिहिलेल्या मराठी कादंबरी मालिकेतील मुख्य काल्पनिक नायक आहे. त्यांच्या धाडसी स्वभावामुळे बनेश समस्त कुमार जगताचा लाडका सुपरहिरो आजही आहे. ‘फास्टर फेणे’ खेरीज भागवतांनी अनेक स्वतंत्र, व त्याहून अधिक भाषांतरित पुस्तके लिहून कुमारवाचकांचे विश्व समृद्ध केले.एकंदरीत १८४ पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. त्याखेरीज ते ‘मराठी नाटय़कोश’ तयार करणारे नाटय़-अभ्यासक व समीक्षक होते. इ.स. १९७५ सालच्या बालकुमार साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते.
( संकलीत)