(१५ जुन १९३३ - ३ ऑगस्ट २००७ )
मराठीतील चरित्रवाङ्मयाचा जेव्हा विचार होतो, विशेषतः अर्वाचीन काळातील प्रबोधन चळवळींच्या काळातील व्यक्तींची चरित्रे हा चर्चेचा विषय असतो; तेव्हा सरोजिनीबाईंचे नाव आवर्जून घ्यावे लागते. हा काळ वैचारिक प्रबोधनाचा, खळबळीचा असून तो सरोजिनीबाईंच्या चिंतनाचा, औत्सुक्याचा आणि विशिष्ट संस्कारित जीवनाचा विषय आहे. म्हणून त्यांनी दिवाकरांवर लिहिले, गोपाळ हरी देशमुखांवर लिहिले, काशिबाई कानिटकरांवर लिहिले आणि लंडनच्या आजीबाई वनारसेंवर त्यांच्या कुटुंबीयांच्या विनंतीवरून लिहिले. त्या-त्या व्यक्तींच्या वेळचा काळ सजीव केला.
‘पहाटपाणी’, ‘शब्दायन’ यांमधील ललित लेख प्रसन्न शैलीत अनुभवरूपाला साकार करणारे, ‘आत्मीय’ अनुभव प्रकट करणारे आहेत. आजूबाजूचा समाज, त्यातील माणसांचे जगणे, वागणे व स्वतःला आलेले अनुभव यांवर त्यांनी या लेखातून नेमकेपणाने बोट ठेवले आहे.बाईंनी आयुष्यभर ज्ञानसाधना केली. त्यांना ‘वाग्विलासिनी’ म्हणून मानले गेले.
दादर वनिता समाजाने त्यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविले. महाराष्ट्र सेवा पुरस्कार, द.ग. गोडसे यांच्या कलामीमांसेसाठी दिलेला पुरस्कार, त्यांच्या एकूण पाच पुस्तकांना मिळालेले महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार आणि भारतीय शिक्षण प्रतिष्ठानाने केलेला गौरव हेच प्रमाणित करतात की, सरोजिनीबाईंनी वाङ्मयसेवक म्हणून केलेले कार्य अत्यंत मौलिक आहे. मुंबई विद्यापीठात प्रथम अधिव्याख्याता व नंतर मराठी विभागप्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले व अध्यापनही केले. सरोजिनी वैद्य व त्यांचे पती शंकर वैद्य ह्या साहित्यिक दांपत्यांचा वाढदिवस एकाच दिवशी असायचा.
( संकलीत)