( १५ जुन १९२८ - २३ सप्टेंबर २०१४ )
स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला... शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाळा...’ अशा मोजक्याच, पण अजरामर शब्दरचनांनी काव्य रसिकांवर गेली अनेक दशके गारूड करणारे मराठी कवितेच्या ‘पालखीचे भोई’ कविवर्य प्रा. शंकर वैद्य. सोपे आणि सहजसुंदर शब्द हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य होते. अगदी नवखा वाचकही त्यांच्या काव्याशी पटकन जोडला जायचा.केवळ कवी म्हणूनच नव्हे तर उत्तम समीक्षक, शिक्षक, ललित लेखक, उत्तम वक्ते व सूत्रसंचालक म्हणूनही ते सर्वपरिचित होते.
शंकर वैद्य यांना तल्लख स्मरणशक्तीचे वरदान लाभले होते.त्यांचे सूत्रसंचालन हा साहित्य रसिकांसाठी अवर्णनीय अनुभव असायचा. मराठी वाङ्मयात काही दाम्पत्यांनी लक्षणीय कार्य केले आहे. कवी अनिल आणि कुसुमावती, इंदिरा संत आणि ना.मा. संत यांप्रमाणेच डॉ. सरोजिनी वैद्य आणि कवी शंकर वैद्य हे दाम्पत्यही मराठी वाङ्मयक्षेत्रातील त्यांच्या कार्यासाठी लक्षात राहील असे आहे.योगायोगाने या दाम्पत्याचा वाढदिवस एकाच दिवशी असायचा. साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल वैद्य यांना महाराष्ट्र शासन, कोकण मराठी साहित्य परिषद, वाग्विलासिनी मा. दीनानाथ प्रतिष्ठानच्या पुरस्कारांसह अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.
( संकलीत)