(५ ऑगस्ट १८५८–११ जून १९२४).
वासुदेव वामन खरे हे मराठी ग्रंथकार व इतिहाससंशोधक. शिवाजी-संभाजी ह्या पितापुत्रांच्या संबंधांवर लिहिलेले गुणोत्कर्ष (१८८५) हे त्यांचे पहिले नाटक. त्यानंतर इतिहाससंशोधन करीत असता, आवश्यक ते आर्थिक स्थैर्य लाभावे, यासाठी त्यांनी बरेचसे नाट्यलेखन केले. तारामंडळ (१९१४), चित्रवंचना (१९१७), शिवसंभव (१९१९), उग्रमंगल (१९२२) आणि देशकंटक (१९३०) ही त्यांची काही नाटके, गुणोत्कर्ष आणि शिवसंभव ही नाटके ऐतिहासिक परंतु त्यांच्या इतर नाटकांत अद्भुततेला व अतिरंजनाला स्वाभाविक वाव असूनही त्यांत संभाव्यता आणि प्रासादिकता राखण्यात ते यशस्वी झाले आहेत.
नाना फडनविसांचे चरित्र (१८९२) हे इतिहासक्षेत्रातील त्यांचे पहिले पुस्तक. त्यानंतर संशोधन-संपादन प्रकाशनाचा प्रचंड उद्योग त्यांनी केला. १८९७ मध्ये ऐतिहासिक-लेख-संग्रह हे मासिक काढून ते तीन वर्षे चालविले. पटवर्धन जहागिरदारांच्या जुन्या चिटणीशी दप्तरांतील ऐतिहासिक महत्त्वाच्या कागदपत्रांतून ऐतिहासिक लेख संग्रहाचे चौदा खंड सिद्ध केले. पहिले अकरा खंड त्यांनी स्वत: आणि शेवटचे तीन खंड त्यांच्या निधनोत्तर त्यांचे चिरंजीव य. वा. खरे ह्यांनी संपादिलेले आहेत. ह्या लेखसंग्रहाच्या प्रस्तावना, तसेच न. चिं. केळकरकृत मराठे व इंग्रज (१९१८) ह्या ग्रंथाची प्रस्तावना ह्यांवरून वासुदेवशास्त्र्यांचा व्यासंग, विद्वत्ता आणि साक्षेपीपणा दिसून येतो.
( संदर्भ - मराठी विश्वकोश, स. ग. मालशे)