लेखक - बाबा भांड
प्रकाशक - साकेत प्रकाशन
माणसं जन्मभर कष्ट करतात. कुटुंबासाठी, मित्रांसाठी, समाजासाठी काही देऊ करतात. काही जण मात्र फक्त स्वतः साठीच जगतात. सृष्टी नियमानुसार मग एक दिवस शरीर अचेतन होते. त्याला आपण प्रेत म्हणतो. या प्रेताची अंत्य व्यवस्था अगत्यपुर्वक, आदराने, गेलेल्या आत्म्याचा अपमान होणार नाही अशा पद्धतीने करणं हे त्या व्यक्तीच्या वारसा सागणाऱ्यांचं कर्तव्य असतं. त्यात हेळसांड होता कामा नये, अन्यथा त्याचे परिणाम वारसांना भोगावे लागतात. असं शास्र सांगतं, त्यामुळे आपल्या धर्मशास्रात प्रेतकर्मात मदत करणं हे मोठं पुण्यकर्म मानलं जातं.
श्रीमंत असो वा गरीब, स्वत:ला सुशिक्षित अधुनिक म्हणवून घेणारे, माणूस गेला म्हणजे सगळं संपलं, माती झाली म्हणत या सगळ्या क्रियाकर्माची अंधश्रद्धा म्हणून हेटाळणी करणारे सुध्दा घाटावरचा ब्राह्मण सांगेल ते सगळे विधी करून पितरांच्या रागापासून मुक्त राहण्याचा प्रयत्न करतात. कितीही आव आणला तरीही मनात पुर्वापारची सुप्त भिती प्रत्येकाला वाटत असते. प्रसंगी भरघोस दक्षिणा देऊन थोडक्यात उरकून घेतात. अशिक्षित किंवा खालच्या स्तरातील लोक मात्र पोटाला चिमटा घेऊन, उधारउसणवार करुन पैसे उभे करतात आणि सगळे विधी अगदी श्रद्धेने करतात.
पैठणच्या गोदातीरी घाटावर घडणारे हे कथानक. वेगवेगळ्या घटना जरी असल्या तरी तीच ती ठराविक माणसं परत परत या घटनांतून दिसतात म्हणून कथानक. यात लहान दहा बारा वर्षाची मुलं सुध्दा आहेत. अस्थी विसर्जनाच्या किंवा चितेची राख विसर्जन करतांना खाली चाळणी धरायची, चिल्लर मिळण्याची खात्री असायची, नशिब थोर असेल तर कधी एखादा सोन्याचा मणीही मिळायचा. सकाळी शाळेत जाणारी बहुतेक मुलं दप्तरात चाळणी ठेवायचे. ऐनवेळी पंचाईत व्हायला नको म्हणून. गिऱ्हाईक नाही हातालं लागलं तर शाळेत जायचं. काही मुलं इतकी तयार झाली होती. त्यांच्या मदतीने ब्राह्मण एका वेळी अनेकांचे विधी मांडून मुलांकडून अर्धीनिर्धी प्रसंगी पुजा करवून घ्यायची. मिळालेल्या दक्षिणेतून दोन पाच रुपये मिळाले की मुलंही आनंदात घरी जायची.
माणूस गेल्यावर दहा दिवसांपर्यंत होणारे सगळे विधी करणारे ब्राह्मण सुध्दा समोर आलेल्या यजमानाची एका नजरेत पाहणी करून किती दक्षिणा घेता येईल याचा अंदाज बांधून यजमान आपल्या हातातून सुटणार नाही याची काळजी घेतात.
कथानक जसे पुढे सरकते तसे मग जळजळीत सत्य मनाला कुरतडायला लागते.
काय ठेवलं आहे या पवित्र विधीत ? बाजार मांडून ठेवला होता. त्या बाजारात सगळ्यांची दुकानं मांडलेली होती. अंत्यविधीची लाकडं विकणारी, सामान विकणारे आणि त्याची दलाली घेणारे ही होते, डोकी भादरणारे होते प्रेताची राख घेऊन येणारी माणसं बघितली की आनंदाने चेहरे फुलणारी चिमुरडी मुलं होती आणि आपल्या कमाईतलं हिस्सा दादाला खंडणी म्हणून देणारे ब्राह्मणही होते.
असेही दिवस यायचे जेव्हा चार सहा दिवसात कोणी मेलं नाही तर चिंताग्रस्त झालेले चेहरे होते.
नव्वदीच्या दशकाच्या आरंभी ही कादंबरी जेव्हा लोकमत मध्ये प्रकाशित होऊ लागली. दोन तीन प्रकरणं प्रसिद्ध होताच संपादकांना, लेखक बाबा भांड यांना धमकीची पत्रे मिळाली. अर्थात त्यांनी पत्राकडे दुर्लक्ष केले. बाबा भांड मग या विषयाच्या खोलात शिरले. व नंतर नव्याने लिखाण करुन संशोधित कादंबरी पुस्तकरूपाने १९९५ साली प्रकाशित केली.
महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारासह या कादंबरीस आठ पुरस्कार मिळाले असून पाच आवृत्त्या निघाल्या.