(७ जुलै १९२३ - २५ जुन १९८० )
कथाकार, कादंबरीकार,समिक्षक.विद्यार्थिदशेत त्यांच्यावर प्राध्यापक न.र.फाटक व समीक्षक वा.ल.कुलकर्णी यांचा खूप प्रभाव पडला.‘आभाळाचा रंग निळा’ या जोगांच्या कादंबरीत एका सुसंस्कृत मनाचे व्यापार जसेच्या तसे व्यक्त झाले असून त्यापूर्वीच्या त्यांच्या ‘काळोख आणि किरण’ या पहिल्या कादंबरीत त्यांचे अनुभव बोलके झाले आहेत. ‘मी जे महाविद्यालयीन जीवन अनुभवले त्यातूनच ही कलाकृती जन्मली’ असे ते म्हणतात. विद्यापीठीय स्तरावर निस्संशय साहाय्यभूत ठरेल असे ‘दीपस्तंभ’ व ‘दीपदर्शन’ हे समीक्षाग्रंथ त्यांनी लिहिले. ‘साहित्यात जे-जे नवे काही घडत असते, त्याचा शोध घ्यावा ही माझ्या साहित्यप्रेमी मनाची आवड आहे’ असे त्यांनी म्हटले आहे. ‘दीपस्तंभ’मध्ये व्यक्त झालेल्या जोगांच्या विचारानुसार ‘समीक्षा हीपण एक साधनाच असते... निर्भयपणा, कलाकृतीच्या निर्मितीच्या स्वरूपाची जाण, भावजीवनाविषयी सहानुभूती हे गुण समीक्षकापाशी असले, तर लेखक त्याच्या मताची कदर करायला तयार असतात...‘श्रेष्ठ कलाकृतीचा एक निकषच असा असतो की, प्रत्येक वाचनाचे वेळी त्यातून नवे विचारधन व सौंदर्यकण मिळत जातात.’ असे जोगांचे मत आहे. उपरोक्त पुस्तकांव्यतिरिक्त ‘लावण्य क्षितिजे’ (१९८१), ‘अरूपाचे रूप’ (१९७८) व ‘संत नामदेव’ (१९७०) ही पुस्तकेही जोग यांनी लिहिली आहेत. ( संदर्भ - महाराष्ट्र नायक, वि ग जोशी)