१८५७ मध्ये बाबा पद्मनजींनी ‘यमुना पर्यटन अथवा हिंदू विधवांच्या स्थितीचे निरूपण’ या पहिल्या स्वतंत्र सामाजिक कादंबरीची निर्मिती केली.
१८६१ साली आलेली लक्ष्मणशास़्त्री हळबे यांची ‘मुक्तामाला’ ही अद्भुतरम्य कादंबरी अत्यंत लोकप्रिय झाली. १८६१ ते १८८५ हा काळ तर ‘मुक्तामालायुग’ म्हणून ओळखला जातो.
याच काळात अद्भुतरम्य कादंबऱ्यांनी जोर पकडला असताना ऐतिहासिक कादंबरी हा प्रकार पुढे आला. त्यातही रहस्य रोमांच अद्भुतरम्यता असायची. रा.भि. गुंजीकरांची ‘मोचनगड’ ही मराठीतील पहिली ऐतिहासिक कादंबरी १८७१ साली आली, वि.ज. पटवर्धनांची ‘हंबीरराव व पुतळाबाई’, ना.वि. बापटांच्या ‘संभाजी ’आणि ‘चितुरगडाचा वेढा’ या कादंबऱ्या गाजल्या. यात रहस्य रोमांच असायचेच.
असे असले तरीही रहस्य रोमांचात अवगुंठलेल्या अद्भुतरम्य साहित्याची चर्चा करतांना पहिला उल्लेख येतो तो वीरधवलचा.
मुक्तामालाने मराठी साहित्यात जो रहस्य, रोमांच युक्त अद्भुतरम्य कादंबरीचा स्वतंत्र प्रवाह निर्माण केला त्यात एका शतकापूर्वी प्रसिद्ध झालेल्या नाथमाधव यांच्या वीरधवल या कादंबरीने आपले विषेश स्थान निर्माण केले आहे.
१९१३ साली प्रकाशित झालेल्या या कादंबरीचा लोकप्रियता आजही तेवढ्याच उच्च स्तरावर आहे. नंतर गो. ना. दातारशास्रींनी शालिवाहन शक, कालिका मुर्ती, इंद्रभुवन गुहा अशा कादंबऱ्यांतून वाचकांना आकर्षीत केले. तर ऐंशी नव्वद च्या दशकात शशी भागवतांच्या मर्मभेद, रत्नप्रतिमा, रक्तरेखा या कादंबऱ्यावर वाचकांच्या उड्या पडल्या.
दरम्यानच्या काळात अशा अदभुत कथा प्रकारचे सहित्य केव्हा आले केव्हा गेले हे ही समजले नाही. कारण कुठे थरार कमी झाला, कधी वातावरण निर्मिती परिणामकारक झाली नाही, तर कधी रहस्य वाचकाला खिळवून ठेऊ शकले नाही. यातील काही पुस्तके बाल साहित्य म्हणून समजले गेले.
अद्भुतरम्य कादंबरी हे अत्यंत अवजड शिवधनुष्य असते. प्रत्येकाला तोलवेलच असे नाही. यात साहित्यातील नवरसांचा प्रमाणबद्ध वापर होतो. रहस्य आणि थरारात अवगु़ठलेलला हा साहित्य प्रकार फार मोठे आव्हान असते.
म्हणूनच अदभुत कथा प्रकारात नाथमाधव लिखित वीरधवल कादंबरी अत्यंत महत्वाची ठरते.