पुस्तकाचे नावः सेपीअन्स
(मानव जातीचाअनोखा इतिहास)
लेखक: युव्हाल नोआ हरारी
अनुवाद: वासंती फडके
प्रकाशक:डायमंड पब्लिकेशन पुणे
साडेतेरा अब्ज वर्षा पासूनच्या ऊर्जेच्या जन्मापासूनचा हा प्रवास ते भविष्य काळात काय होऊ शकेल इथ पर्यंतचा प्रवास या पुस्तकात अतिशय रोमांचकारी भाषेत पुस्तकात मांडला आहे, बोधात्मक क्रांती, कृषिक्रांती, माणसांचं एकीकरण, आणि वैज्ञानिक क्रांती असे चार महत्वाचे विभाग असून
पहिल्या विभागात साडेतेरा अब्ज वर्षा पूर्वी च्या ऊर्जेच्या जन्मापासून ते तेरा हजार वर्षा पर्यंत चा कालावधी असून, या कालावधीच्या शेवटाला आज अस्तित्वात असलेली होमो सेपीअन्स ही एकमेव मानवजात जिवंत राहिल्या पर्यंतचा अतिशय रोमांचकारी उत्कंठावर्धक इतिहास बघायला मिळतो.या विभागातील वर्णने एकदम भन्नाटच आहे.या काळात काय काय गमती जमती झाल्या पहा एक एक गोष्ट वाचली की तोंडांत बोटे जातात.
तीनशे ऐंशी कोटी वर्षा पूर्वी पाहिले जीव निर्माण झाले.आणि तेव्हापासून जीवविज्ञान अस्तित्वात आले. त्यानंतर बराच कालावधी गेल्यानंतर म्हणजे साठ लक्ष वर्षापूर्वी मानवाची आणि चिपंझीची समान आजी जन्माला आली.आणि होमो कुळ अस्तित्वात आले.या कालावधीत तब्बल ३६ लक्ष वर्षे गेली आणि २४ लक्ष वर्षापूर्वी होमो कुळातल्या प्राण्यांची आफ्रिकेत उत्क्रांती झाली.मानवाने दगडांची अवजारे निर्माण केली.त्यानंतर च्या चार लाख वर्षात म्हणजेच वीस लक्ष वर्षापूर्वी तत्कालीन मानव आफ्रिका खंडातून युरेशियात पसरला आणि त्यातून मानवाच्या वेगवेगळ्या प्रजातींची उत्क्रांती झाली. यापुढील कालावधीत मानवाच्या एकंदर सहा जाती अस्तित्वात होत्या त्यातील फक्त एक जात आज अस्तित्वात आहे ती म्हणजे आपण सगळे ....होमो सेपिअन्स.
या पुढील कालावधीत अनेक महत्वाच्या घटना घडल्या.होमो सेपिअन’ या सजीवांच्या जातीनं याहूनही अधिक गुंतागुंतीच्या ‘संस्कृती’नामक रचनांची निर्मिती केली. या मानवी संस्कृतींचा उत्तरोत्तर जो विकास होत गेला, त्याला ‘इतिहास’ असं संबोधलं जायला लागलं.
अंदाजे सत्तर हजार वर्षांपूर्वी बोधात्मक (कॉग्निटिव्ह) क्रांतीनं इतिहासाची सुरुवात झाली. सुमारे बारा हजार वर्षांपूर्वीच्या कृषिक्रांतीनं त्याला गती दिली.आपल्या भटक्या पूर्वजांनी एकत्र येऊन शहरं आणि राज्य स्थापन केली. मग देव, धर्म, राजे आणि मानवी हक्क अशा गोष्टींवर आपण कसा
विश्वास ठेवायला लागलो याचे विवेचन येते.
केवळ पाचशे वर्षांपूर्वी सुरू झालेल्या वैज्ञानिक क्रांतीनं आणि त्यातून दोनशे वर्षापूर्वी निर्माण झालेल्या आद्योगिक क्रांतीने कदाचित इतिहासाची अखेर होऊन काहीतरी पूर्णपणे वेगळंच उदयाला येऊ शकेल. या तीन क्रांतींनी मानवावर आणि त्याच्या बरोबरीनं भूतलावर राहणाऱ्या इतर सजीवांवर काय परिणाम झाला याची माहिती या पुस्तकात वाचायला मिळते.
अनेक संस्कृती, राजवटी, साम्राज्य, भाषा, लिप्या यांचा उदयास्त फार सुरेख रित्या या पुस्तकात उलगडून दाखविला आहे.
हे सगळ वाचायला एकदम भन्नाट आणि भारी आहे, पण त्याही पेक्षा पुस्तकाच्या अखेरीस लेखक युव्हाल हरारी यांनी जे स्वतः चे विचार मांडले आहेत ते अखिल मानवजातीस विचार करायला लावणारे आहेत.....
आज आपण आगबोटीपासून अवकाशयानापर्यंत प्रगती केली आहे; पण आपण कुठे चाललो आहोत हे कोणालाच माहीत नाही. आज आपण कधी नव्हे इतके शक्तिशाली झालो आहोत; पण या शक्तीचं काय करायचं याची कोणालाच फारशी कल्पना नाही त्याहूनही वाईट बाब म्हणजे आज माणूस कधी नव्हे इतका बेजबाबदार झालेला दिसतो. केवळ भौतिक विज्ञानाचे नियम सोबतीला असलेले आपण स्व-निर्मित देव बनलेलो आहोत आणि आपण कोणालाच बांधील नाही. परिणामी स्वतःच्या सुख सोयी आणि करमणूक यांसाठी आपण इतर प्राण्यांचा आणि परिस्थितीचा विध्वंस करत चाललो आहोत. आणि तरीही आपण समाधानी नाही. स्वतःला काय हवं आहे हे स्वतःलाच ठाऊक नसलेल्या असमाधानी आणि बेजबाबदार देवांपेक्षा अधिक धोकादायक काय असू शकतं का?
आपला इतिहास व आत्तापर्यंत झालेली प्रगती थक्क करणारी असली तरीही भविष्य मात्र अंतर्मुख करणारं आहे.