डॉ. कमला सोहोनी
भारतातील पहिल्या विद्यावाचस्पती (पीएचडी) पदवीधारक शास्त्रज्ञ
स्मृतिदिन - २८ जून १९९८
====================
डॉ. कमलाबाई सोहोनी या भारतातील पहिल्या विद्यावाचस्पती (पीएचडी) पदवीधारक शास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. ब्रिटीश अंकित राष्ट्रातली एक हिंदुस्थानी मुलगी म्हणून त्यांना आपल्या शिक्षणासाठी संघर्ष करावा लागला. सन १९३३ मध्ये रसायनशास्त्र हा विषय घेऊन त्या पहिल्या वर्गात बीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यांनी वर्तमानपत्रातीत जाहिराती नुसार शास्त्रीय संशोधनासाठी बंगलोर येथील 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ़ सायन्स' मध्ये अर्ज केला. टाटांनी १९११ मध्ये स्थापन केलेल्या या संस्थेत प्रवेश मिळणे अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जाई. प्रवेशासाठी कमलाबाई पूर्णपणे पात्र होत्या, परंतु संस्थेचे प्रमुख, नोबेल पारितोषिक विजेते सर सी.व्ही. रामन यांनी 'मुलगी असल्याने प्रवेश देता येत नाही' असे कमलाबाईंना कळविले. कमलाबाई श्री. रामन यांना प्रत्यक्ष भेटल्या व 'मुलगी म्हणून माझ्यावर होणारा अन्याय मी कदापि सहन करणार नाही, आणि इथे राहून मी संशोधन करून एम.एस्सी. होणारच.' असे ठामपणे सांगितले. श्री. रामन यांनी कमलाबाईंच्या हट्टास्तव त्यांना एका वर्षासाठी प्रवेश दिला. मग वर्षभर कमलाबाईंनी बायोकेमिस्ट्री या विषयाचा झपाटून अभ्यास केला. वर्ष अखेर रामन त्यांना म्हणाले, "तुमची निष्ठा आणि चिकाटी पाहून असे वाटते की, यापुढे संस्थेत फक्त मुलींनाच प्रवेश द्यावा." पुढे १९३७ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या 'स्प्रिंगर रिसर्च' आणि 'सर मंगलदास नथूभाई' या शिष्यवृत्त्या मिळवून कमला सोहोनी इंग्लंडला गेल्या. तिथे केंब्रिज मधील जगप्रसिद्ध सर विल्यम डन लॅबॉरेटरीचे डायरेक्टर, नोबेल पारितोषिक विजेते सर फ़्रेड्रिक गॉलन्ड हॉपकिन्स यांना भेटून, संस्थेत प्रवेश देण्याची विनंती केली. त्यावर त्यांनी 'माझ्या प्रयोगशाळेतील सर्व जागा भरल्या आहेत, तुला जागा मोकळी दिसली तर सांग' असे सांगितले. कुणाचीच ओळख नसल्याने बाई हताश झाल्या, तेव्हाच तेथील एक शास्त्रज्ञ डॉक्टर रिक्टर यांनी त्यांना आपली जागा देऊ केली. दिवसा त्या जागेवर, सकाळी आठ ते संध्याकाळी पाचपर्यंत काम करीत, आणि रात्री डो. रिक्टर. पहिले सत्र संपायला केवळ दोन-तीन दिवस बाकी असताना कमलाबाईंनी केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला आणि 'प्राणिमात्रांप्रमाणे सर्व वनस्पतीतीलही साऱ्या जीवनक्रिया 'सायटोक्रोन-सी'च्या मध्यस्थीने एन्झाइम्समुळे होतात, हे मूलभूत महत्त्वाचे संशोधन सादर करून १९३९ साली केंब्रिज विद्यापीठाची विद्यावाचस्पती (पीएचडी) ही पदवी संपादन केली. इतरांचे प्रबंध हजार-पंधराशे पानांचे असताना, कमलाबाईंचा प्रबंध अवघ्या ४० पानांचा होता आणि तो त्यांनी त्यावेळी एका व्याख्यानाद्वारे सभागृहापुढे ठेवला. त्यानंतर अनेक शास्त्रज्ञाच्या आग्रहाला बळी पडून पुढील संशोधनासाठी इंग्लंडमध्ये न राहाता, डॉ. कमलाबाई मायभूमीच्या प्रेमाने भारतात परत आल्या. दिल्लीच्या 'लेडी हार्डिंग्ज कॉलेज' व पुढे मुंबईच्या (रॉयल) इन्स्टिट्यूट ऑफ़ सायन्स' या संस्थेत त्यांनी काम केले. मुंबईच्या याच संस्थेच्या निदेशक म्हणून त्या निवृत्त झाल्या. 'लेडी हार्डिंग्ज कॉइलेज मधली जीवरसायनशास्त्राच्या प्राध्यापकाची त्यांची नोकरी, डॉ. हॉपकिन्स यांच्या सूचनेनुसार १९३८ सालापासून कमलाबाईंकरिता राखून ठेवण्यात आली होती. इंग्लंडहून आल्यावर १९३९ मध्ये, सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात त्या आपल्या नोकरीवर रूजू झाल्या.
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण