जी. ए. कुलकर्णी

जी. ए. कुलकर्णी 



(१० जुलै १९२३ - ११ डिसेंबर १९८७ ). 

स्वातंत्र्योत्तर काळातील एक श्रेष्ठ मराठी कथाकार. पूर्ण नाव गुरुनाथ आबाजी कुलकर्णी.  पहिला कथासंग्रह निळासावळा (१९५९) प्रकाशित झाल्यावर यांच्या कथेचे सामर्थ्य दिसून आले. ते म्हणजे कथेच्या अंतःस्वरूपात बदल घडवून आणण्याचे तिचे वेगळेपण. त्यानंतर पारवा (१९६०), हिरवे रावे (१९६२), रक्तचंदन (१९६६) आणि काजळमाया (१९७२) असे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध झाले.



 यांपैकी निळासावळा आणि रक्तचंदन  या दोन कथासंग्रहांस महाराष्ट्र शासनाची पारितोषिके मिळाली. शिवाय रक्तचंदन  या संग्रहाला ललित मासिकातर्फे पुरस्कार मिळाला. साहित्य अकादमीने १९७३ मध्ये काजळमाया  या संग्रहाला मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट साहित्यकृती म्हणून पारितोषिक दिले परंतु त्यांनी हे पारितोषिक परत केले.


जी. ए. हे चार भिंतींतील माणसांची कथा काव्यात्म शैलीने सांगतात आणि माणसामाणसांमधील भावबंधनाचे व त्यांना अगतिक, नगण्य बनवणाऱ्या नियतीच्या असीम शक्तीचे दर्शन घडवितात. ठिपका, विदूषक, दूत इ. रूपककथांचे रूप वेगळे. त्या मनाचा पिच्छा पुरविणाऱ्या दुःस्वप्‍नासारख्या वा अतिवास्तववादी चित्रासारख्या वाटतात. त्यांतून ते जन्ममृत्यू, नियतीचे सामर्थ्य, माणसाची जीवनेच्छा व या सर्वांतून जाणवणारे जीविताचे गूढ यांचे भेदक विश्लेषण करतात. त्यांना मानवी दुःख आणि मानवाची असत्‌प्रवृत्ती यांतून एक प्रकारची उग्रता व दाहकता जाणवते. त्यांचा जिवंत अनुभव त्यांच्या कथेतून उमलतो. त्यांच्या चांगल्या कथा लेण्यातील शिल्पासारख्या भव्य वाटतात. १९४५ नंतर उदयास आलेल्या मराठी नवकथेचा पुढचा एक विकसित टप्पा त्यांच्या कथासाहित्याने गाठला आहे 

( संदर्भ - विश्वकोश,भालचंद्र फडके)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.