पां. स. पिसुर्लेकर

डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर: 


(३० मे १८९४ – १० जूलै १९६९). 

गोव्यातील एक प्रसिद्ध इतिहासकार. पिसुर्लेकरांनी स्फुटलेख व शोधनिबंध यांव्यतिरिक्त अनेक पुस्तके लिहिली. त्यांचे लेखन मुख्यत: पोर्तुगीज भाषेत असून त्याचे मराठी व इंग्रजी भाषांत भाषांतर झाले आहे. त्यांचे पुढील ग्रंथ महत्त्वाचे आहेत : अ आन्तीग् ईन्दिय् ई ऊ मून्दु इश्तेर्नुं (१९२२), आश्पॅक्तुश् दा सिव्हिलिझासांव् दा ईन्दिय् आन्तीग् (१९२४), पुर्तुगेझिश् ई मारातश् (१९२६–३९), रेजिमॅन्तुश् दश् फोर्तालेझस् दा ईन्दिय् (१९५१), आजॅन्तिश् दा दिप्लोमासीय पुर्तुगेझ ना ईन्दिय् (१९५२), आस्सेन्तुश् दु कोंसेल्यु दु इश्तादु दा ईन्दिय् (१९५३–५७). यांखेरीज त्यांनी अनेक पोर्तुगीज कागदपत्रे प्रसिद्ध केली. अ आन्तिगिदादि दु क्रिश्नाईज्मु या पुस्तकात कृष्णसंप्रदाय हा इसवी सनापूर्वीपासून अस्तित्वात होता, हे सिद्ध करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.



 त्यांचा पोर्तुगेज-मराठे संबंध अर्थात पोर्तुगेजांच्या दप्तरांतील मराठ्यांचा इतिहास (१९६७) हे पुस्तक महत्त्वाचे असून मराठ्यांच्या इतिहासावर त्याने नवीन प्रकाश टाकला आहे.
पिसुर्लेकरांना लेखनसंशोधनाबद्दल अनेक मानसन्मान मिळाले. पोर्तुगाल शासनाने त्यांना नाइट ऑफ द मिलिटरी ऑर्डर ऑफ सँटिएगो हा किताब दिला (१९३५). याशिवाय रॉयल एशिॲटिक सोसायटी (बंगाल) आणि एशिॲटिक सोसायटी (मुंबई) यांनी त्यांना सुवर्णपदके दिली (१९४८ व १९५३). लिस्बन विद्यापीठाने डी. लिट्. ही सन्मान्य पदवी त्यांना देऊन त्यांचा यथोचित गौरव केला. 

( संदर्भ - मराठी विश्वकोश, सु रा देशपांडे)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.