(१२ जून १८९४ - ४ नोव्हेंबर १९९१ ).
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पाली भाषाकोविद, बौद्ध धर्मग्रंथांचे भाषांतरकार आणि संपादक. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच सिंहली, ब्रह्मी आणि थाय लिप्यांचा त्यांनी अभ्यास केला होता. बापटांनी संपादिलेल्या ग्रंथात २५०० ईअर्स ऑफ बुद्धिझम (१९५९ ) हा विशेष उल्लेखनीय होय. बुद्धाचे जीवन आणि शिकवण बौद्ध धर्माचा उद्गम आणि विस्तार त्या धर्मातील प्रमुख पंथ बौद्ध साहित्य विद्या आणि कला बौद्ध धर्म आणि आधुनिक जग बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन अशा अनेक महत्वपूर्ण विषयांसंबंधीचे व्यासंगी विद्वानांचे लेख ह्या गंथात अंतर्भूत असून स्वत: बापटांनी आपल्या लेखनाने ह्या ग्रंथास मोठा हातभार लाविला आहे.
बापट ह्यांनी सु. १४॰ शोधनिबंध लिहिले असून त्यांतील ‘आग्नेय आशियातील भारतीय संस्कृती’, ‘काँट्रिब्यूशन ऑफ बुद्धिझम टू इंडियन कल्चर’, ‘करण-संपत्ति’, ‘श्ली-पद (हत्तीरोग) अँड ए रेमेडी फाउंड इन ए पाली कॉमेंटरी’ हे विशेष उल्लेखनीय होत. दे. द. वाडेकर संपादित मराठी तत्त्वज्ञान-महाकोशात तसेच महाराष्ट्र शासनाच्या मराठी विश्वकोशात महत्त्वपूर्ण नोंदी लिहून त्यांनी महाराष्ट्रातील कोशकार्यासही आपल्या विद्वत्तेचा लाभ दिला. अखिल भारतीय प्राच्यविद्यापरिषदेच्या १९४३ व १९६१ ह्या दोन अधिवेशनांत पाली-प्राकृत विभागाचे अध्यक्ष १९४६च्या अधिवेशनात पाली बुद्धिझम विभागाचे अध्यक्ष व ह्या परिषदेच्या १९७४ च्या कुरुक्षेत्र अधिवेशनाचे ते प्रमुख अध्यक्ष होते. बौद्ध ग्रंथांसंबंधीचे त्यांचे कार्य लक्षात घेऊन ‘नवनालंदा विद्याविहारा’ने १९७४ ला ‘विद्यावारिधि’ ही सर्वोच्च पदवी देऊन त्यांचा गौरव केला.
( संदर्भ - मराठी विश्वकोश)