लेखिका - शोभा बोंद्रे
प्रकाशक - रोहन प्रकाशन
ही गोष्ट आहे उज्जैनसारख्या शहरातील पारंपरिक विचाराच्या बोहरा मुसलमान समाजातील झरीना लकडावाला जी लग्नानंतर झरीना बनातवाला बनली आणि तिथेच नावासोबत तिचे आयुष्य सुध्दा बदलले.
झरीना चं व्यक्तिमत्त्व आक्रमण, बंडखोर असं मुळीच नव्हतं. तिच्या कडे होता विचारांचा ठामपणा. समोरच्याला आपलं म्हणणं पटवून देण्याची क्षमता... म्हणूनच ती शिकली. काॅलेजात असतांना तिचं लग्न ठरलं. उज्जैन मधील धनाढ्य घराण्यातील आदिल बनातवालाने तिला आपल्या कुटुंबियाकरवी लग्नासाठी मागणी घातली. त्यांच्या समाजाच्या रिवाजाप्रमाणे तिचं शिक्षण तिथेच थांबलं असतं. पण तिने वडिलांना पटवून दिले. तिच्या एका मैत्रिणीच्या वडीलांनी घरी येऊन तिच्या वडीलांना समजवले. शिक्षण चालू राहिले. लग्नानंतर पहिल्याच रात्री पदवी मिळेपर्यंत आपण संयम बाळगूया. हे पतीला सांगण्यासाठी धाडस लागतं. ते तिने केले. आणि सगळे अडथळे पार करुन ती पदवीधर झाली. उज्जैन मधील त्यांच्या समाजातील पदवीधर झालेली ती पहिली मुलगी होती. आदिल आठवी नापास होता.
पुढच्या एक दोन वर्षात तिच्या सासरची श्रीमंती कर्जाच्या विळख्यात सापडून विरघळत गेली. लकडावालांची पाच मजली हवेलीवर सुध्दा कर्ज होतं. मागे राहीला रखरखीत वाळवंटात व्यसनाधीन झालेला पती. आणि एक वर्षाची मुलगी..
झरीनाच्या वडीलांची व्यवसायात भावाकडून फसवणूक झाली होती. कफल्लक अवस्थेत ते कुटुंबासह मुंबईला आले. आपल्या वर्षभराच्या मुलीला घेऊन झरीना त्यांच्या सोबत मुंबईला आली. आपला भार वडिलांवर न टाकता मिळेल ती नौकरी करून, घरी रात्री उशिरापर्यंत शिलाई मशिनवर काम करीत ती स्वत:चा आणि तिची मुलगी सनाचा चरितार्थ चालवीत होती. टायपिंग, शाॅर्टहॅंड शिकली. तिचा पती अदिल अडथळ्यासारखा तिच्या आयुष्यात येत राहीला. तिच्याकडचे पैसे घेऊन जात राहीला. नंतर त्याला टिबी झाला तेव्हा झरीनाने त्याच्या उपचारासाठी अनेक खस्ता खाल्ल्या. दरम्यान झरीनाला बेस्ट मध्ये नौकरी मिळाल्यामुळे काहीशी स्थिरता मिळाली होती. अमलीपदार्थाच्या वाहतुकीत पोलिसांनी त्याला अटक केली. तेव्हा त्याच्या सुटकेसाठी त्याने झरीनाला जे करायला सांगीतले. ते समजल्यावर झरीनाच्या वडीलांनी त्याला हाकलून देऊन झरीनाला त्याच्यापासून तलाक मिळवला. आदिलच्या आयुष्यला कोणतेही ध्येय नव्हते. त्याने कोणतीही जबाबदारी पुर्ण केली नाही. त्याची दोन व्यसने दोन टोकाची.. रात्रीच्या वेळी तीन पत्ती, मटका असं काही आणि दिवसा भेंडीबाजारच्या लायब्ररीत रोज नवीन पुस्तकं वाचायचा.. तासंतास डायरीत लिहित असायचा. शेरोशायरी ही चांगली करायचा..
डोक्यावरच्या छपरासाठी, दोन वेळच्या जेवणासाठी, सनाच्या उज्वल भविष्यासाठी झरीना चिकाटीने झटत होती. बेस्ट ची नौकरी करूनही पार्टटाईम नौकरी करीत होती. काही कारणाने ती नौकरी सुटल्यावर तिच्या एका मैत्रिणीच्या
चार्टड अकाउंटंट भावाच्या ऑफिसमध्ये तिने पार्टटाईम नौकरी करायला सुरुवात केल्यावर काही दिवसांनी तिच्या आयुष्याला परत कलाटणी मिळाली.
सना चांगल्या मार्क मिळवून दहावी पास झाली. शाळेत पहिली आली. पुढे ती उच्च शिक्षणासाठी दिल्लीला गेली.
खरं तर प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार येत असतात. झरीनाच्या आयुष्यात आलेल्या चढ उतार फार तीव्र आणि टोकदार गर्भगळीत करणारे होते. या सगळ्यावर मात करण्यासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती, मानसिक कणखरतेची गरज असते. मुंबईत आल्यावर तिची मुलगी सना हीच तिच्या जगण्याचं ध्येय बनलं. म्हणून ती सुरुवातीच्या मोहाच्या क्षणांना बळी पडली नाही.
लेखिकेची आणि झरीनाची भेट दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये झाली. लेखिकेची मुलगी शलाका आणि झरीनाची मुलगी सना हॉस्टेलमध्ये रुममेट होत्या. त्यामुळे अनेक भेटींमधून झरीना तुकड्या तुकड्याने झरीनाचे आयुष्य लेखिकेसमोर उलगडत गेले. जगाकडे, आयुष्याकडे बघण्याच्या सकारात्मक दृष्टीकोन कौतुकास्पद वाटला म्हणून लेखिकेने झरीनाची कथा शब्दबद्ध करुन शैलीदारपणे वाचकांसमोर आणली.