पुस्तकाचे नाव - व्हाईट मुघल्स
लेखक - विल्यम डॅलरिंपल
अनुवाद - सुधा नरवणे
हैद्राबाद येथील ईस्ट इंडिया कंपनीचा रेसिडंट अधिकारी मेजर जेम्स ऑचिल्स कर्कपॅट्रिक आणि एक घरंदाज मुस्लिम तरुणी खैरुन्निसाची अगदी खरीखुरी प्रेम कथा.
अठराव्या शतकातील या आंतरवंशीय प्रेमकथेचा पहिला धागा हेद्राबाद मधील एका जुन्या इमारतीत हाती आल्यावर लेखकाने शोध घ्यायला सुरुवात केली आणि चार वर्षांच्या संशोधनातून ही सत्यकथा वाचकांसमोर आणली.
दोघांच्या वयात मोठे अंतर असुनही आणि खैरुन्निसाचा निकाह ठरलेला असुनही आईकडूनच या प्रकरणाला खतपाणी घातले गेले त्याला निजामाच्या दरबाराकडूनही पाठिंबा होता त्याची राजकीय कारणे वेगळी होती. अधूनमधून दोघांच्या गाठीभेटी होत होत्या. जेम्सने तिच्यावर बलात्कार केला, तिच्या मामाचा खून केला अशा अफवाही पसरल्या. ईस्ट इंडिया कंपनी सरकारने या संपूर्ण प्रकरणाची पुर्ण चौकशी केली तेव्हा ह्यात कसलेही तथ्य आढळले नाही. मात्र जेम्स ने मुस्लिम रितीरिवाज व पोशाख घालायला सुरुवात केली होती. मुस्लिम धर्म स्विकारून लग्नाच्या वेळी जेम्स निजामाचा दत्तक पुत्र झाला तर खैरुन्निसा पंतप्रधानांची मुलगी झाली. त्यावेळी ती पाच महिन्याची गरोदर होती.
त्यानंतर त्यांना अजून एक अपत्य झालं.
भविष्याचा विचार करून त्याने ह्या मुलांनाही इंग्लंडला आपल्या वडिलांकडे पाठवलं.
दुर्दैवाने जेम्स कर्कपॅट्रिकचे आजारपणामुळे अकाली निधन झाल्यावर खैरुन्निसावर दु:खाचा डोंगर कोसळला त्यावेळी तिला हेन्री रसेलने आधार दिला. जो कर्कपॅट्रिकचा सहाय्यक होता. पण दुसऱ्या मुलीशी लग्न करून त्याने खैरुन्निसाला एकटं पाडलं.
जेम्स कर्कपॅट्रिक खैरुन्निसासाठी सगळ्या गोष्टींंचा, अगदी नौकरीचाही त्याग करायला तयार होता. मात्र हेन्री रसेलने नौकरी वाचवण्यासाठी खैरुन्निसाचा त्याग केला होता.
वैधव्यकाळात खैरुन्निसाला प्रथम बदनामीला तोंड द्यावे लागले‚ हद्दपार व्हावे लागले आणि अखेर परित्यक्तेचे जीवन कंठावे लागले. ती मृत्यू पावली ते शारीरिक विकाराने हे जितके खरे तितकेच प्रेमभंग उपेक्षा व दुःखामुळे तिची जीवनेच्छा संपली असेल.
सुरुवातीला कंपनी सरकारचे कर्मचारी व अधिकारी कमी वयात भारतात आल्यावर कसा वंशसंकर झाला याचे विवेचन केले आहे. हे पुस्तक म्हणजे फक्त जेम्स कर्कपॅट्रिक व खैरुन्निसाची प्रेम कथा नसून त्या वेळची सांस्कृतिक व सामाजिक सरमिसळ झालेली राजकीय परिस्थिती, आणि मुख्यत्वे कर्कपॅट्रिक घराण्याचा तीन पिढ्यांचा इतिहास सुध्दा आहे जो जेम्स कर्कपॅट्रिकच्या वडिलांपासून ते त्याच्या मुलांपर्यंत पोहोचतो जे अगदीच बालवयात इंग्लंडला गेले होते.
संशोधनातील पहिला अस्सल दुवा लेखकाला सापडला तो कर्कपॅट्रिक आणि त्याचा भाऊ विल्यम यांच्या पत्रव्यवहारात. ही पत्रे विल्यमचे वंशज− स्ट्रॅची कुटुंबांनी जपली होती आणि नुकतीच ती इंडिया ऑफिस लायब्ररीने विकत घेतली होती. या प्रेमप्रकरणाची ईस्ट इंडिया कंपनीने चौकशी केल्याची फाइलही अकस्मात मिळाली. साक्षीदारांनी शपथेवर दिलेली उत्तरे‚ त्यांना विचारलेले प्रश्न‚ आश्चर्य वाटतील असे परखड प्रश्न आणि त्यांची कोणताही आडपडदा नसलेली उत्तरे त्यात होती. दिल्लीमधील इंडियन नॅशनल अर्काइव्हजच्या तळघरात हैदराबाद रेसिडेन्सीच्या दफ्तराचे सहा खंड उघड्या जागेत ठेवलेले आहेत त्याच्यातही या प्रेमकथेची पाने होती. अशा शोधातून ही प्रेमकथा वाचकांसमोर आली.