लेखिका - सुनेत्रा चौधरी
अनुवाद - सुदर्शन आठवले
प्रकाशक - मंजुल पब्लिशिंग हाऊस
अॅन्का रुमानियाची रहिवासी होती. सौंदर्य व संपत्ती दोन्हीही तिच्याकडे भरभरून होते. तिचा विवाह एका बड्या, प्रभावी, भारतीय उद्योगपतीशी झाला होता. पण दुर्दैवाने त्याच्यामागे आणि म्हणून तिच्यामागेही कायदा हात धुवून लागला, तिला तुरुंगवास घडला. बाहेर आल्यावर तिने या लेखिकेला मुलाखत देऊन तुरूगातील अनुभव सांगितले. ती मुलाखत खुप सनसनाटी ठरली. तिने तुरुंगातील तिच्या ‘दालना’तील एलसीडी टीव्ही आणि त्यावरील ‘स्टार वर्ल्ड प्रीमियर’ या वाहिनीवरील मनोरंजक कार्यक्रमांच्या साहाय्याने तेथील जीवन सुसह्य करून घेतले होते. तेथे तिने ‘ऑरेंज इज द न्यू ब्लॅक’ या गाजलेल्या विनोदी अमेरिकन टीव्ही मालिकेचा एकही भाग चुकवला नाही हे जेव्हा लेखिकेने तिच्याकडून ऐकले, तेव्हाच तिच्या मनात या विषयावर पुस्तक लिहावे या कल्पनेने मूळ धरले. त्यासाठी तुरुंगात अॅन्कासारख्या सोयीसुविधा मिळवण्याची ऐपत असलेल्या आणि तिच्याचसारखे तेथील अविश्वसनीय अनुभवांविषयी सत्यकथन करायला हरकत नसणाऱ्यांचा शोध घ्यायचे ठरवले. असे काही जण होते, जे स्वत: उपभोगलेल्या सुखसोयींबद्दल बोलायला संकोच वाटत होता. पण त्यांनी त्यांच्या बरोबर तुरुंगात असलेल्या इतर काहींसाठी तेथील नियमांना कशी मुरड घातली जात होती ते सांगितले आणि मग त्या इतरांपैकी काहींनी ‘त्या’ संकोची व्यक्तींच्या विचित्र व विक्षिप्त कथा ऐकवल्या.
अमरसिंग, पप्पू यादव, टी राजा, सोमनाथ भारती, याचसोबत आरुषी खून प्रकरणातील तलवार पती पत्नी, शिना बोरा खून प्रकरणातील मुखर्जी, अशा वलयांकित लोकांसह काही अपरिचित व्यक्तिमत्वेही आहेत जे न्याय मिळवण्यासाठी झगडत होते. त्यांचे तरुंगातील वास्तव्य फारच विदारक होते.
तामिळनाडूचा एक तरुण दुबईत नौकरी करणारा इंटरपोलने त्याच्यावर रेडकाॅर्नर नोटीस का बजावली हे त्यालाही माहीत नव्हते. सहार विमानतळावर त्याला अटक करून जेलमध्ये टाकलं. आठवडा भराने त्याला दिल्लीच्या तिहार जेल मध्ये हलवलं तो पर्यंत मुंबईच्या जेलमध्ये त्याला बरी वागणूक मिळावी म्हणून त्याच्या आईवडीलांनी पाच लाख रुपये तुरूंगातील वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना दिले होते,
आरुषी खून प्रकरणातील राजेश आणि नुपुर तलवार या दांपत्याने त्यांच्या आरामदायी जीवनाची सर्व सोय दसना जेलमध्ये करून घेतली होती.
सहारा श्री सुब्रतो बॅनर्जी साठी सर्व सोयींनी युक्त कोठडी होती. त्यांना त्याचे सहकारी, वकील केव्हाही भेटू शकत होते.
टेलीफोन घोटाळ्याप्रकरणी मंत्री टी राजा व जेसिका लालचा खुनी मनु शर्मा एकाच वेळी तिहारला होते तेव्हा मनू शर्मा मंत्री साहेबांना विचारायचा, सर एवढे कोट्यवधी रुपये ठेवले तरी कुठे आणि कसे..! ते दोघं एकत्रित बॅडमिंटन खेळायचे.
निर्भया बलात्कार प्रकरणातील विनय शर्मा याने जेलमध्ये आत्महत्या केली. त्याच्या वकिलांनी तुरूंगात त्याचा फक्त छळ झाल्याची माहिती दिली. लैंगिक हा शब्द उच्चारला नाही.
तुरूंगातील ब्लेडबाज हे जणू सुपारीबाज मारेकरी. दोन पाच हजाराची सुपारी घेऊन प्राणघातक हल्ला करणारे. या हल्लेखोरांची दहशत नक्षलवादी चळवळचे आरोपी कोबाड गांधी यांना सुध्दा वाटायची. सुरेश कलमाडी यांनाही एका ब्लेडबाजने धमकी दिली होती.
कोबाड गांधी आणि संसद हल्ला प्रकरणातील अफजल गुरू यांची चांगली मित्रता झाली होती.
असे अनेक किस्से या पुस्तकातून वाचायला मिळतात. या गुन्हेगारांच्या किंवा आरोपींच्या गुन्ह्याची, खटल्याची सविस्तर माहिती दिली आहे. यातून न्यायव्यवस्थासुध्दा संशयातीत राहत नाही. काय निकाल द्यायचा याचे पुर्ण स्वातंत्र्य न्यायधिशांना आहे. पण सुनावणीपुर्व जामिनावर सुटका, तुरुंगवास भोगत असतांना मिळणारी जामिनावर सुटी याचे सध्याचे दर यावर बरीच चर्चा चालते. काही प्रकरणांच्या पोलीस तपासाबाबतीही गंभीर प्रश्न उभे केले असून काही अधिकऱ्यांचा स्पष्ट उल्लेख केला असून त्यातील एक नाव मुंबई हल्ल्यातील हुतात्मा साळसकरांचे आहे. मुंबई लोकल बाॅम्बस्फोटाचा तपास करतांना एटीएस ने संशयितांकडून कबुलीजबाब घेण्यासाठी निर्मम अत्याचार केले.
तुरूंगातील कायदे नियम तुरुंगाधिकाऱ्यांच्या मर्जीवर ठरतात. बाकी कोणालाही आणि कशालाही तिथे काहीही किंमत नसते.जर भरपूर पैसे खर्च करण्याची तयारी असेल तर पंचतारांकित सुविधा सूद्धा मिळू शकतात. ही चीड आणणारी वस्तूस्थिती अनेक तुरुंगवासी बोलून दाखवतात. तुरुंगात अल्ट्रा माॅडर्न फोन मिळू शकतो पण वैद्यकीय कारणासाठी अल्ट्रासाउंड तपासणी करायची परवानगीसाठी झगडावं लागतं. ती मिळेलच याची शाश्वती नाही.
मुळातच तुरुंगात क्षमतेच्या दुप्पट तिप्पट कैदी आहेत. शिक्षा कालावधी निर्धारित कैदी कमी असून खटला सुरू न झालेल्या कैद्यांची संख्या जास्त आहे. असेही काही कैदी आहेत ज्यांच्यावर गुन्हा शाबीत झाला तरी जास्तीत जास्त एक दोन वर्षाची शिक्षा होईल. असे कैदी वर्षानुवर्षे खटला सुरू होण्याची वाट बघत खितपत पडले आहेत.
कैद्यांना भोगावे लागणारे हाल, अत्याचार निरनिराळ्या प्रकारचे कमी अधिक तीव्रतेचे असतात. पण दहशतवादाच्या आरोपींचे भोग अगदी वेगळ्या पातळीवरचे असतात. तेथील कैद्यांमध्ये मैत्री होते, मदतही केली जाते परंतु राष्ट्रविरोधी काम करणाऱ्यांना कधीही कुठेही सामावून घेतलं जातं नाही.
पोलीस तपास यंत्रणा व न्यायव्यवस्थेचं अंतरंग उघडं करून सर्वसामान्य वाचकांना जणू एक वेगळ्याच जगाची सफर घडवून आणणारं हे पुस्तक नक्कीच अंतर्मुख करणारं आहे.